हेमकांत गायकवाड
चोपडा: येथे महाविकास आघाडीचा राज्यव्यापी बंद असला तरी मात्र चोपडा शहरात महाविकास आघाडीने राज्यव्यापी बंद न पाळता काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे अंकलेश्वर बऱ्हाणपूर राज्य महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करत घटनेचा निषेध केला तर शिवसेना तर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून केंद्र सरकारचा विरोधात घोषणा देण्यात आल्या.१९४७ नंतर प्रथमच अशी निंदनीय घटना घडली की, एका मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांवर गाडी चालवली. या घटनेमुळे संपूर्ण जगात भारताची प्रतिमा मलिन झाली असल्याचे राष्ट्रवादी तर्फे माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी म्हणाले..
महाराष्ट्र राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांनी सत्तेसाठी आप आपले स्वतंत्र असलेले राजकीय ध्येय, धोरण, उद्दिष्टे आणि काम करण्याची पद्धत बाजूला ठेवून महाविकास आघाडी केली आहे. हे नागरिकांच्या मतदारांच्या चांगल्या प्रकारे लक्षात आले आहे.
चोपडा तालुक्यात अनेक समस्या प्रलंबित असताना तसेच नैसर्गिक अनियमित आपत्तीमुळे, कोरोनामुळे आधीच सर्व जाती धर्मातील नागरिक शेतकरी, व्यापारी, मजूर वर्ग आर्थिक अडचणीत सापडला आहे. तसेच सहकारी प्रकल्प बंद पडण्याच्या मार्गावर असताना आणि काही बंद पडलेले असल्याने तसेच चोपडा, यावल, तालुक्यात अनुक्रमे शिवसेना, भारतीय राष्ट्रीय
काँग्रेस, सत्ताधारी विद्यमान आमदार असताना आणि रावेर लोकसभा मतदार संघात केंद्रातील भाजपाच्या खासदार रक्षाताई खडसे असताना सुद्धा नागरिकांना व व्यापाऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अनेक विकास कामांमध्ये गैरप्रकार, भ्रष्टाचाराच्या तक्रारी नागरिकांच्या असताना त्याकडे विद्यमान आमदार, खासदार, आणि काही जबाबदार पदाधिकारी कार्यकर्ते यांचे सोईस्कररित्या दुर्लक्ष होत आहे. यावल, रावेर, चोपडा तालुक्यातील मतदार
संघातील मतदारांमध्ये नागरिकांमध्ये
राजकारणाविषयी नाराजी व्यक्त करण्यात येत
आहे. यामुळेच चोपडा शहरातील नागरिक, व्यापारी, शेतकरी, मजूरवर्ग महाविकास आघाडीच्या राज्यव्यापी बंद पासून चार हात लांब राहिल्याचे संपूर्ण चोपडा शहरात बोलले जात आहे.
असे असताना सुद्धा चोपडा शहरात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष पदाधिकारी कार्यकर्ते यांनी राज्यव्यापी बंद न पाळता केवळ रास्ता रोको आंदोलन करून पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांना निवेदन देण्यात आले.