चोपड्यात तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्याचे कुटुंबासह आमरण उपोषण बेकायदा पद्धत अवलंबून केलेली बेकायदा नोंद रद्द होण्याची मागणी….

0
30

हेमकांत गायकवाड

चोपडा –   आडगाव तालुका चोपडा येथील शेतकरी विजय जगन्नाथ पाटील (वय ४६) , त्यांच्या आई अहिल्याबाई जगन्नाथ पाटील (वय – ६८) तसेच त्यांच्या पत्नी छायाबाई विजय पाटील हे तिघे दि. २१ सप्टेंबर वार मंगळवार रोजी पासून चोपडा तहसील कार्यालय समोर आमरण उपोषणास बसले आहेत.

सविस्तर वृत्त असे की, मौजे आडगाव येथील शेती मिळकत गट नंबर ६८अ क्षेत्र ० हे २७ आर , आकार ० रू ८५ पैसे , गट नं ६८ ब क्षेत्र १ हे १७ आर , आकार ३ रू ५० पैसे या मिळकतीच्या सातबारा उताऱ्यावर दि.२७ ऑगस्ट २०२१ पर्यंत विजय जगन्नाथ पाटील यांचे स्वर्गीय पिता जगन्नाथ चुनीलाल पाटील व त्यांचे चुलते हयात दशरथ चुनीलाल पाटील यांची नावे सामायिक होती. व आजही कब्जा दोघांच्या पन्नास पन्नास टक्के असल्याचे उपोषण कर्त्यांचे म्हणणे आहे .

तसेच सदर मिळकतीबाबत मे दिवानी न्यायाधीश (क स्तर ) यांचे न्यायालयात दावा न्यायप्रविष्ट आहे असे असताना उपोषण कर्त्यास कोणतीही नोटीस न देता अचानक बेकायदा पद्धतीने दि.२७ ऑगस्ट २०२१ रोजी उपोषण कर्त्यांचे स्वर्गीय पित्याचे नाव सदर मिळकतीच्या सातबारा उतारावरून कमी करण्यात आल्याचे म्हणणे आहे .

तरी फेरफार नोंद हितसंबंधीयांना नोटीस न देता मंजूर होतेच कशी? , नोंद झाल्यावर ती नोंद अतिद्रुतगतीने (केवळ एक दिवसात) प्रमाणित होतेच कशी? , ज्याच्या मयत पित्याचे नाव सातबारा उताऱ्यावर हटवले गेले त्याच्या वारसांचे जबाब नोंदविण्याशिवाय नोंद प्रमाणित होतेच कशी? असे विविध प्रकारचे प्रश्न उपोषण कर्ते विजय जगन्नाथ पाटील यांनी उपस्थित केले आहेत. तरी माझ्यावर झालेल्या अन्यायास त्वरित न्याय मिळावा अशी त्यांनी मागणी केली आहे.

तलाठी प्रशांत वसंतराव पवार ,मंडळाधिकारी सपकाळे व तहसीलदार यांनी बेकायदा पद्धत अवलंबून माझ्यावर अन्याय केला असल्याचे उपोषणकर्त्यांनी सांगितले आहे . यासंदर्भात तलाठी प्रशांत पवार यांच्याशी भ्रमणध्वनी वरुन संपर्क साधला असता तहसिलदार यांच्या आदेशित पत्राने सदर नोंद केली असल्याचे सांगितले …

मी यापूर्वीही आमरण उपोषणास बसण्यासाठी अर्ज दिला होता पण गणेशोत्सवाचे कारण दाखवत मला उपोषणास बसण्यास मज्जाव करण्यात आला होता व आताही उपोषण थांबवण्यासाठी तहसील कार्यालयामार्फत विविध प्रयत्न केले जात असल्याचे उपोषणकर्त्यांनी सांगितले .जोपर्यंत न्याय मिळणार नाही ,तोपर्यंत उपोषणावर आम्ही ठाम राहणार असे त्यांनी स्पष्ट स्पष्ट केले .

चोपडा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ मनोज पाटील यांनी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास उपोषणकर्त्यांची भेट घेतली व त्यांची प्रकृतीची तपासणी तसेच उपोषण कशासाठी समजून घेतले व ऊपोषण थांबवण्यासाठी विनंती देखील केली .

सदर विषयासंदर्भात तालुक्याचे तहसीलदार अनिल गावीत यांची भेट घेतली असता त्यांनी सदर नोंद बेकायदाने नाही तर कायद्याने केली असल्याचे स्पष्ट केले तसेच तहसील कार्यालयामार्फत कोणत्याही प्रकारचे चुकीचे काम झाले नसल्याचे स्पष्ट केले .उपोषणकर्त्यांनी उपोषणाचा मार्ग न अवलंबता त्यांनी न्यायालयात अपील करावे असेही तहसीलदार अनिल गावीत यांनी स्पष्ट केले.

Spread the love