गोरगावलेचे माजी सरपंच जगन्नाथ बाविस्कर यांची आग्रही मागणी.
चोपडा – येथुन गोरगावले बुद्रुक-भोकर-कानळदा मार्गे जळगाव पर्यंतचा नवीन महामार्ग राज्यमार्ग बनवितांना रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या लहानमोठ्या वृक्षांची तोड करण्यात येऊन प्रत्येक गावाच्या बसस्टॉप लगतची झाडेही तोडण्यात आलेली आहेत. तेथील प्रवाशांना मोकळ्या जागेवरच वाहनांची वाट पाहत उभे रहावे लागते. पर्यायाने प्रवाशांना कडक ऊन वारा पाऊस याचाही सामना करावा लागतो. या मार्गासाठी शासनाने हायब्रीड योजनेअंतर्गत कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करतांना प्रवासी निवारा (बसस्टॉप शेड) बांधणेसाठी विशेष निधी मंजूर करणे गरजेचे होते.
तसेच दोन वर्षांपासून ह्या मार्गावरील १ जानेवारी पासून ३१ मे पर्यंत सुरू राहणारी बससेवा पुर्णतः बंद करून कासव गतीने सुरू असलेल्या तापी नदिवरील नविन पुल बांधकामाच्या नावाखाली वर्षानुवर्षांपासूनची बससेवा बंद केल्याने प्रवाशांना मरणयातना सहन कराव्या लागत आहेत. दररोज ह्या मार्गावरून इतर शेकडों लहानमोठी मालवाहु अवजड वाहने, खाजगी प्रवासी वाहतूक वाहने येजा करतात. त्यात बसेसच्या दहा बारा फेऱ्यांना काय अडचण आहे? असाही सवाल लोकांच्या मनात आहे. सध्याच्या लग्नसराईत व कडक उन्हाळ्यात बससेवा पुर्ववत सुरू करून प्रवाशांचे हाल थांबवावेत. सा.बां.विभागाने ह्या वापरयोग्य रस्त्याची त्वरित तपासणी करून बससेवा सुरू करणेबाबतचा अहवाल एस.टी. विभागाकडे पाठवावा.
तसेच ह्या रोडवरील प्रत्येक गावाच्या बसस्टॉपवर प्रवासी शेड बांधण्यात यावेत, अशी सुचक मागणी चोपडा मार्केट कमेटीचे माजी संचालक व गोरगावलेचे माजी सरपंच जगन्नाथ बाविस्कर यांची ह्या पत्रकांन्वये केलेली आहे.