शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकांवर एफआयआर दाखल करा, असे आदेश आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात राज्यस्तरीय हंगामपूर्व आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती, यावेळी ते बोलत होते.
यंदाच्या पावसाळय़ावर ‘एल निनो’चा प्रभाव असल्याचे सांगण्यात येत आहे, मात्र अन्य दोन घटक पावसाला अनुकूल आहेत. त्यानंतरही पावसाने ओढ दिली तर कृषी विद्यापीठांनी पेरण्यांचे वेळापत्रक निश्चित करावे. त्याविषयी कृषी विभागाने शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी. बोगस बियाणे, खते विव्रेत्यांविरुद्ध कडक कारवाई करावी. वेळप्रसंगी त्यांचे परवाने रद्द करावेत. कृषी कर्जासाठी अडवणूक करणाऱ्यांविरुद्ध एफआयआर दाखल करावा. पीक कर्ज वितरणाला गती देऊन जिल्हा प्रशासनाने पीक कर्ज वितरणाचा नियमितपणे आढावा घेण्याचे आदेश फडणवीस यांनी दिले. बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.











