भुसावळ :- संविधान नगर , फेकरी येथे १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज, संत रविदास व बाबासाहेबांच्या मातोश्री भीमाबाई यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली.
या प्रसंगी धनराज मोतिराय यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण माहिती देऊन आज देशात महापुरुषांच्या विचारांना दुर्लक्षित केले जात असल्याने जाती जातीत संघर्ष केला जातो, प्रत्येक महापुरुषाने दिलेले विचार हे देशाच्या, समाजाच्या उद्धाराचे आहे पण आपण त्यांना जाती जातीत विभागून टाकले तेंव्हा समाज जोडो, महापुरुष जोडो असा नवा उपक्रम आपल्याला राबवावा लागेल, त्याची नांदी म्हणजेच आजचा कार्यक्रम होय.
प्रसिद्ध साहित्यिक जयसिंग वाघ यांनी आपल्या भाषणात सांगितले की, शिव जयंती, भीम जयंती संयुक्तरीत्या साजरी होत आली आहे पण शिव जयंती व रोहिदास जयंती संयुक्तरीत्या प्रथमच साजरी होत आहे त्याच बरोबर बाबासाहेबांच्या मातोश्री भीमाबाई यांचीही जयंती एकत्रित होत आहे ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. भीमाबाई यांचे माहेरचे व सासरचे लोक सैन्यात कामाला होते त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती उत्तम होती, त्यांना समाजातून मानसन्मान मिळत असे. भिमाई यांना बाबासाहेबांची जडण घडण करण्याची, त्यांच्यावर संस्कार करण्याची संधीच मिळाली नाही.
या प्रसंगी जया वानखडे यांनी भारतीय संविधानात शिवाजी महाराज व संत रविदास यांची विचारधारा कशी आली आहे याची कलम निहाय सुरेख माहिती देऊन भारतात संविधान विरोधी जी विचारधारा आहे त्या विरुद्ध संघर्ष करण्याची वेळ आली आहे असे सांगितले. या प्रसंगी वाल्मीक पवार, आनंद छपानीमोहन, जी. जी. नरवाडे, अलका सपकाळे, अशोक निकम यांनी मनोगत व्यक्त केले. सुरवातीस जयसिंग वाघ व धनराज मोतीराय यांच्या हस्ते शिवाजी महाराज, संत रविदास व भिमाई आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेंद्र हिवाळे, प्रास्ताविक पुंडलिक ठाकरे, स्वागत समाधान सपकाळे तर आभारप्रदर्शन मनीषा जाधव यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोहनिश अटकाळे, अक्षय सपकाळे, एस. एम. अटकाळे, पंचफुला छपानीमोहन यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास तेजस जाधव, शुभम घोटमल, कैलास बिजरोटे, अजय जसवाल, देवीलाल लोदाने, राजहंस खंडारे, ई. एन. पांडव, किशोर आराक आदींसह स्त्री पुरुष मोठ्यासंख्येने हजर होते.