यावल – तालुक्यातील चिंचोली येथील सार्वजनिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीचा पेपर होता. येथे फैजपूर उपविभागीय कार्यालयाच्या सहाय्यक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग यांनी दुपारी दोन वाजता भेट देत तपासणी केली असता तीन वर्गातून विद्यार्थिनींनी कॉपी बाहेर फेकल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
तेव्हा त्यांनी तातडीने शिक्षणाधिकारी यांना सूचना करीत केंद्रप्रमुख सह पर्यवेक्षक अशा ५ जणाविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा प्रकारचा यावल तालुक्यात हा सलग दुसरा गुन्हा दाखल झाल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ झाली आहे.
ऐन पेपर संपण्याच्या वेळेवरच दोन्ही ठिकाणी कारवाई झाल्याने पर्यवेक्षकाचे काम करणारे शिक्षक मात्र प्रचंड तणावांमध्ये सापडले आहे. या कारवाईमुळे शिक्षकांच्या संघटनाचे पदाधिकारी मोठ्या संख्येत यावल पोलीस ठाण्यात एकत्र आले होते व एखादी विद्यार्थ्याने कुठलातरी कागद जरी बाहेर फेकला तरी अशा प्रकारे शिक्षकांना वेठीस धरणे चुकीचे आहे असे सांगत त्यांनी रोष व्यक्त केला.
चिंचोली ता. यावल येथे सार्वजनिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आहे. यावल येथील विद्यालयात इयत्ता दहावीचे परीक्षा केंद्र असून येथे शनिवारी इयत्ता दहावीचा पेपर सुरू होता. दरम्यान पेपर दोन वाजता संपणार त्याच वेळी सदर केंद्रावर फैजपूर उपविभागीय कार्यालयाच्या सहाय्यक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग यांनी भेट दिली आणि वर्गाबाहेरून त्या जात असतांना वर्ग क्रमांक ५ वर्ग, क्रमांक ६ आणि वर्ग क्रमांक ११ मधून विद्यार्थिनींनी कॉफीचा कागद बाहेर फेकल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तेव्हा त्यांनी तातडीने यावलचे शिक्षण अधिकारी यांना सुचना करीत कारवाई करण्याचे आदेश दिले व यावल पोलीस ठाण्यात गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके यांच्या फिर्यादीवरून केंद्र प्रमुख बाळू पितांबर पाटील, केंद्र उपप्रमुख सतीश रामदास पाटील, पर्यवेक्षक विनायक दगडू कोष्टी, पर्यवेक्षक कल्याणी राहुल महाले, पर्यवेक्षक स्वीटी विनायक पवार या पाच जणाविरुद्ध महाराष्ट्र विद्यापीठाच्या मंडळाच्या व इतर विधीनिष्ठ परीक्षा मध्ये होणाऱ्या गैरप्रकारास प्रतिबंध अधिनियम १९८२ चे कलम ७,८ सह कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास यावलचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार असलम खान करीत आहे.
पेपर संपण्याची वेळ होती. त्याच वेळेला वर्गातून जर कोणी काही कागद जरी बाहेर फेकला तो कॉपीचा आहे असे ग्राह्य धरून थेट केंद्र प्रमख, शिक्षक पर्यवेक्षक यांच्यावर गुन्हा दाखल करणे हे चुकीचं आहे. हे तर एका प्रकारे शिक्षकांना वेठीस धरले जात असून प्रसंगी शिक्षक राज्यभरात परीक्षा कामकाजावर बहिष्कार टाकतील अशा शब्दात शिक्षकांच्या संघटनांनी पोलीस ठाण्यात एकत्र येऊन संताप व्यक्त केला.
फैजपूर उपविभाग कार्यालयाच्या सहायक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग यांनी सातत्याने ही दुसरी कारवाई केली आहे. यापूर्वी त्यांनी यावल शहरातील डॉ. झाकीर हुसेन उर्दू हायस्कूल या केंद्रात कारवाई केली होती व आता चिंचोली येथे कारवाई करीत गुन्हा दाखल करण्याच्या सूचना केल्या. एकूणच त्यांनी केलेल्या या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रामध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.
कॉपीला समर्थन नाही मात्र, कारवाईत पारदर्शकता पाहिजे.
कॉपीला प्रतिबंध करा, पण अशा प्रकारे पेपर सुटतांना वर्गा बाहेर कागद अर्थात कॉपी विद्यार्थ्यांने फेकली सांगून केंद्र प्रमुख, पर्यवेक्षक शिक्षकांवर गुन्हे दाखल करणे योग्य नाही. कॉपीला समर्थन नसुन किमान कारवाईत पारदर्शकता दिसु द्या अशा संतप्त प्रतिक्रीया शिक्षकांनी दिल्या.