हळदीच्या कार्यक्रमात नाचताना जळगाव येथील तरुणाचा मृत्यू; हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने मंडपातच कोसळला

0
12

जळगाव – शहरातील श्रीरामनगर भागात नातेवाइकाच्या लग्नसोहळ्यात हळदीच्या कार्यक्रमात वाजंत्रीच्या तालावर नाचणाऱ्या तरुणाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. जळगावच्या मेहरूणमधील रामेश्वर कॉलनीतील राहिवासी असलेल्या या तरुणाचे नाव मयूर राजेंद्र शिंदे (वय ३१) असे आहे.

ही घटना बुधवारी (ता. १०) रात्री साडेदहाच्या सुमारास घडली.

मयूर हा नातेवाइकाच्या विवाहानिमित्त बुधवारी चोपडा शहरातील श्रीरामनगरात आला होता. त्या ठिकाणी हळदीच्या कार्यक्रमात मयूर नाचत असताना अचानक त्याच्या छातीत दुखू लागल्याने तो खाली कोसळला. त्यानंतर जागीच त्याचा मृत्यू झाला. नातेवाइकांनी तातडीने चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात त्याला दाखल केले.

मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर पाटील यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. डॉ. पाटील यांनी दिलेल्या माहितीवरून चोपडा शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. हवालदार शेषराव तोरे तपास करीत आहेत. मयूरच्या मागे पत्नी, आई-वडील, बहीण, भाऊ, मुले असा परिवार आहे. दरम्यान, आनंदमय वातावरण असलेल्या लग्नसोहळ्यात नाचणाऱ्या मयूरच्या दुर्दैवी झालेल्या मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

Spread the love