दहिगावात बालविवाह रोखला ; अल्पवयीन मुलीची बालसुधार गृहामध्ये रवानगी

0
35

यावल – ( प्रतीनीधी )तालुक्यातील दहिगाव येथे होणारा एक बालविवाह वेळीच थांबवण्यात प्रशासनाला यश आले आहे. महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या तत्परतेमुळे अल्पवयीन मुलामुलींचे लग्न टळले असून, या प्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

यावल तालुका महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती अर्चना आटोळे यांना सकाळी 9:45 वाजता दहिगाव येथे बालविवाह होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यांनी तात्काळ पडताळणी सुरू केली. मुलगा आणि मुलीच्या आधार कार्डची तपासणी केली असता दोघांचेही वय अल्पवयीन असल्याचे उघड झाले. यानंतर अधिक चौकशी केली असता, मुलीच्या आई-वडिलांसह कोणतेही नातेवाईक विवाहाला उपस्थित नसल्याने संशय अधिक बळावला.

या घटनेची गंभीरता लक्षात घेऊन श्रीमती आटोळे यांनी संबंधितांना यावल पोलीस ठाण्यात आणले. पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी बालविवाहासंदर्भातील कायदा आणि त्यामुळे होणाऱ्या शिक्षेबाबत माहिती दिली. यानंतर पुढील कारवाईसाठी मुलगा आणि मुलीला बाल न्याय संरक्षण अधिकारी कुणाल शुक्ला, प्रतीक पाटील आणि प्रसन्न बागुल यांच्या ताब्यात देण्यात आले. मुलीला यावल पोलीस कॉन्स्टेबल सारिका वाणी यांच्यासह जळगाव येथील बाल सुधार गृहात पाठवण्यात आले.

या कारवाईत आधार बहुउद्देशीय संस्था, अमळनेर यांचे ‘बालविवाह मुक्त भारत’ यावल-रावेर तालुका (JSNN)समन्वयक अशोक तायडे यांनी मोलाचे सहकार्य केले. एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती अर्चना आटोळे यांनी यावल तालुक्यातील विशेषतः सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी गावांमध्ये बालविवाहाची माहिती मिळाल्यास ग्रामस्थांनी तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

या घटनेने प्रशासनाची सतर्कता आणि बालविवाह रोखण्यासाठीची बांधिलकी अधोरेखित झाली आहे. यावल तालुक्यात अशा घटना भविष्यात घडू नयेत, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे संकेतही अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

Spread the love