जळगाव -: रूग्णालयातून काम आटोपून घरी परतणाऱ्या तरूणाच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत त्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुदैवी घटना मंगळवारी ८ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजता जळगाव तालुक्यातील ममुराबाद गावाजवळ घडली आहे.
याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेश पाटील वय ३२ रा. आडगाव ता.यावल असे मयत दुचाकीस्वाराचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, यावल तालुक्यातील आडगाव येथे राजेश पाटील हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. तो जळगावातील एका खासगी रुग्णालयातील पॅथोलॉजी लॅबमध्ये कामाला होता. मंगळवारी ८ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास काम संपवून राजेश हा आपल्या दुचाकीने घरी आडगावला जायला निघाला. जळगाव तालुक्यातील ममुराबाद गावाच्या पुढे यावलकडून जळगावकडे जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने राजेशच्या दुचाकीला धडक दिली. त्यात राजेशला गंभीर दुखापत झाली. त्यात राजेशचा जागीच मृत्यू झाला. या घटनेबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.