पोलीस भरतीसाठी मैदानात धावताना अमळनेरच्या तरुणाचा मृत्यू

0
19

जळगाव – नवी मुंबईच्या बाळेगाव कॅम्पमध्ये पोलीस भरती प्रक्रियेच्या दरम्यान एका २३ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, हा तरुण अमळनेर येथील रहिवासी असून त्याच्यावर वेळीच उपचार झाले नाही असे नातेवाईकांचे म्हणणे आहे. याप्रकरणी पोलीस घटनेची माहिती घेत आहेत.

नवी मुंबईच्या बाळेगाव कॅम्पमधील पोलीस भरती प्रक्रियेत अमळनेर येथील रहिवासी अक्षय बिऱ्हाडे हा २३ वर्षांचा तरुण सहभागी झाला होता. एस. आर. पी. भरती ग्रुप क्रमांक ११ या ठिकाणी धावपट्टीवर धावत असताना अक्षय मैदानात कोसळला. त्यानंतर अत्यवस्थ स्थितीत तातडीनं कळवामधील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

त्यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी या रुग्णालयात राज्य राखीव दल, पोलीस दल तैनात करण्यात आले आहेत. अक्षय ५०० मीटरचा टप्पा धावून पूर्ण करण्याच्या आधीच मैदानात कोसळला होता. त्याच्यावर वेळीच उपचार झाले नाहीत, असा आरोप नातेवाईंकांनी केला आहे. शवविच्छेदनानंतरच त्याच्या मृत्यूचं कारण समजू शकेल, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

Spread the love