कडाक्याची थंडी आणि बिबट्याची दहशत: तळोद्यातील शेतकऱ्यांचा जीव टांगणीला! रात्रीची वीज वेळ बदलण्याची भारतीय किसान संघाची मागणी…

0
16

शेतकऱ्यांचा जीव स्वस्त झालाय का? रात्रीच्या वीजपुरवठ्यामुळे तळोदा तालुक्यातील शेतकरी संकटात; तहसीलदारांना साकडे

सध्या संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यात कडाक्याची थंडी पडली असून, तळोदा तालुक्यात बिबट्यासह इतर वन्य प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अशा धोकादायक परिस्थितीत महावितरणने (M.S.E.B.) शेतकऱ्यांसाठी रात्री ८:३० ते पहाटे ४:३० अशी वीजपुरवठ्याची वेळ निश्चित केल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. “आम्हाला रात्रीची वीज नको, दिवसा वीज द्या,” या प्रमुख मागणीसाठी आज भारतीय किसान संघ, तळोदा तालुक्याच्या वतीने तहसीलदारांना धडक निवेदन देण्यात आले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, महावितरणने जानेवारी महिन्यासाठी कृषी पंपांच्या वीजपुरवठ्याचे वेळापत्रक रात्रीचे ठेवले आहे. सध्या तालुक्यात हाडं गोठवणारी थंडी असून शिवारामध्ये बिबट्यांचा मुक्त संचार आहे. अशा भयावह वातावरणात आणि किर्रर्र अंधारात पिकांना पाणी देण्यासाठी जाणे म्हणजे शेतकऱ्यांनी मृत्यूच्या दाढेत जाण्यासारखे झाले आहे. जिवाच्या भीतीपोटी अनेक शेतकरी रात्री शेतात जाणे टाळत आहेत, ज्याचा थेट फटका शेती उत्पादनाला बसत आहे. सध्या रब्बी हंगाम जोरात असून गहू, हरभरा (चणे) आणि ऊस ही पिके अत्यंत निर्णायक अवस्थेत आहेत. या पिकांना सध्या सिंचनाची नितांत गरज आहे. मात्र, रात्रीच्या असुरक्षित वेळेमुळे शेतकऱ्यांना पाणी भरता येत नाहीये. जर वेळीच पाणी मिळाले नाही, तर हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाईल आणि उत्पादनावर मोठा परिणाम होईल, अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

“शेतकऱ्यांचा जीव मोलाचा आहे. रात्रीच्या वेळी बिबट्याच्या हल्ल्याची दाट शक्यता असल्याने प्रशासनाने शेतकऱ्यांची सुरक्षा आणि पिकांचे नुकसान टाळण्यासाठी सहानुभूतीपूर्वक विचार करावा. महावितरणने आपल्या धोरणात तातडीने बदल करून रात्रीचा वीजपुरवठा रद्द करून तो दिवसा द्यावा,”. अशी आग्रही मागणी भारतीय किसान संघाने निवेदनाद्वारे केली आहे.सदर निवेदन देताना भारतीय किसान संघाचे मा.जिल्हाध्यक्ष श्री.सुपड्या दादा ठाकरे, तालुका अध्यक्ष श्री.छोटू नाना कलाल, तालुका कार्याध्यक्ष श्री.अशोक पाटील (आमलाड), उपाध्यक्ष श्री.नितीन पाटील, तालुका मंत्री श्री.शिरीष मगरे, जिल्हा पालक श्री.विजयराव सोनवणे यांच्यासह तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी श्री.अर्जुन दत्तू पाटील (धानोरा), श्री.प्रताप गिरासे (प्रतापूर), श्री.अतुल पाटील (मोडवड), श्री.शांतीलाल पिंपरे (तळोदा ), श्री.अर्जुन पाटील (मोड), श्री.मोहन रघुवंशी, श्री.मुकेश जैन, श्री.राजेश चौधरी, श्री.अनिल नाईक, श्री.सतीश सोलंकी, श्री.संजय मोरे, श्री.मनोज पाटील, श्री.योगेश कोळी, श्री.तुळशीराम पाटील आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love