महाराष्ट्र – राज्य सध्या वावड्या आणि रेवड्या उडवण्यात आघाडीवर आहे. अजित पवार यांच्याबाबतही अशाच वावड्या उडवल्या. ते भाजपसोबत जाणार आहेत. त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं जाणार आहे, अशा वावड्या उडवण्यात आल्या.
त्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघणार असल्याच्याही चर्चांना उधाण आलं. अजित पवार यांनी आमदारांची बैठक बोलावली असून त्यांच्याकडे 40 आमदारांच्या सह्यांचे पत्र असल्याचंही माध्यमांवर सांगण्यात आलं. पण अजितदादांनी या चर्चांना तिलांजली दिली आहे. शेवटच्या श्वासापर्यंत मी राष्ट्रवादीतच राहणार असल्याचं अजितदादांनी स्पष्ट केलं आहे, असं दैनिक ‘सामना’तील अग्रलेखात म्हटलं आहे.
बावनकुळे आणि शेलार वेलदोडे
वावड्या उठवणाऱ्यांनी राजकीय भान ठेवायला हवे, असा सल्लाही सामनातून देण्यात आला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे गंमतीशीर गृहस्थ आहेत. त्यांच्या विधानाकडे निव्वळ गंमत म्हणून बघावे लागते. महाराष्ट्रातील दोन महत्त्वाच्या नेत्यांना दिल्लीत बोलावण्यात आले. ते दोन नेते कोण तर बावनकुळे आणि आशिष शेलार. म्हणजे अजित पवारांसारख्या बलदंड नेता 40 आमदारांसह भाजपमध्ये प्रवेश करतोय. त्याबाबत चर्चा करायला दिल्लीत कोण जात आहेत तर हे दोन वेलदोडे. तेव्हा कोणत्या वावड्या किती गंभीर्याने घ्यायच्या? असा खोचक टोला अग्रलेखातून लगावण्यात आला आहे.
शिंदे गट बिनकामाचे ओझे
सध्याच्या मुख्यमंत्र्यांमुळे महाविकास आघाडीचे सरकार गेले. आता भाजपसाठी शिंदे गट हा बिनकामाचे ओझे झाला आहे. हे ओझे कसे फेकता येईल यावर महाराष्ट्र आणि दिल्लीत चर्चा सुरू आहे. आश्चर्य म्हणजे कालचे बाहुबली देवेंद्र फडणवीस हे राज्यातील या सगळ्या उपक्रमातून बेपत्ता आहेत. त्यामुळे राज्यात भाजपातच सर्वात मोठी उलथापालथ सुरू आहे की काय? अशी शंका घ्यायला जागा आहे, असा दावा अग्रलेखातून करण्यात आला आहे. कधी शिवसेना तर कधी राष्ट्रवादी फोडून स्वत:चे घर भरायचे काम सुरू आहे. भाजपची काँग्रेसवरही वाईट नजर आहे. अजित पवार यांच्या भाजपसोबत जाण्याच्या वावड्या आणि रेवड्या उठवून वातावरण गढूळ करण्याचे काम सुरू आहे. महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम सुरू आहे. पण अजितदादांनी हे कारस्थान उधळून लावले आहे, असं अग्रलेखात म्हटलं आहे.