धुळ्यातील लाचखोर अभियंता गणेश वाघ एसीबीच्या जाळ्यात !

0
37

नाशिक – एक कोटींची लाच स्वीकारताना अहमदनगर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कार्यालयातील सहायक अभियंता अमित गायकवाड यास नाशिक एसीबीने शुक्रवार, 3 नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता अटक केली होती. लाच प्रकरणात अहमदनगरचे तत्कालीन अभियंता व सध्या धुळे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यरत कार्यकारी अभियंता गणेश वाघ यांचा सहभाग निष्पन्न झाला मात्र कारवाईची कुणकुण लागताच ते पसार झाले होते मात्र नाशिक एसीबीनीने अत्यंत गोपनीय माहितीच्या आधारे गणेश वाघ यांना अटक केली आहे. संशयित गणेश वाघ यांना मंगळवारी अहमदनगर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने रविवार, 19 नोव्हेंबरपर्यंत सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

एसीबीची राज्यातील सर्वात मोठी कारवाई

अहमदनगर एमआयडीसी येथील तत्कालीन उपअभियंता व सध्या धुळे येथे कार्यरत असलेला कार्यकारी अभियंता गणेश वाघ व अहमदनगर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कार्यालयातील सहायक अभियंता अमित गायकवाड यांनी छत्रपती संभाजीनगरच्या ठेकेदाराचे पाईप लाईनच्या 31 कोटींच्या कामाचे थकीत 2.66 कोटींचे बिल काढण्यासाठी व बिलावर मागील तारखेच्या सह्या करण्यासाठी कंत्राटदाराकडे एक कोटी रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. शुक्रवार, 3 नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता अहमदनगर-छत्रपती संभाजी नगर बायपासवरील शेंडी बायपासजवळ संशयित सहाय्यक अभियंता गायकवाड याने वाहनातच एक कोटींची लाच स्वीकारताच त्यास अटक करण्यात आली तर धुळ्यातील अभियंता गणेश वाघ हा कारवाईची कुणकुण लागताच कुटुंबासह पसार झाला होता.

11 दिवसानंतर लाचखोर अभियंता गणेश वाघ जाळ्यात

आरोपी गणेश वाघच्या शोधासाठी छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, मुंबई व पुणे येथे पथके पाठवण्यात आली होती शिवाय संशयित राज्याबाहेर किंवा देशाबाहेर पळून जाऊ नये, यासाठी विमानतळ प्राधिकरणालाही माहिती कळवण्यात आली होती मात्र संशयित गवसत नव्हता. तब्बल 11 दिवसांची मेहनत फळाला आल्यानंतर नाशिक एसीबीने संशयित गणेश वाघला अटक केली. संशयिताला मंगळवारी अहमदनगर न्यायालयात हजर केले असता रविवार, 19 नोव्हेंबरपर्यंत अर्थात सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तपास पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक स्वप्नील राजपूत, किरण धुळे, संदीप हांडगे करीत आहेत.

Spread the love