दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचे दि.२३ डिसेंबरला ९१ व्या वर्षी निधन 

0
37

जळगाव संदेश न्युज नेटर्वक                            सिनेजगत ,अंकूर, निशांत, मंडी, मंथन यासारखे गंभीर विषय असोत की वेलकम टू सज्जनपूर, वेल डन अब्बा असे हलकेफुलके कथानक… दोन्हीही तितक्याच समर्थपणे हाताळताना समांतर चित्रपट मुख्य प्रवाहातही लोकप्रिय करणारे प्रयोगशील दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचे सोमवारी दि.२३ डिसेंबरला ९१ व्या वर्षी निधन झाले. बेनेगल गेल्या काही वर्षांपासून मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त होते. मात्र गेल्या काही दिवसांत त्यांचा आजार बळावला आणि वोक्हार्ट रुग्णालयात उपचारादरम्यान सोमवारी संध्याकाळी ६.३८ मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालविल्याचे पिया बेनेगल यांनी सांगितले.

चित्रपट समाजाचा आरसा समजलो जातो. व्यावसायिक चित्रपटांच्या माध्यमातून कल्पनाशीलता आणि मनोरंजन होते तर समानांतर सिनेमाच्या माध्यमातून समाजातील दुर्लक्षित घटकांच्या समस्यांचा आरसा दाखविला जातो. भारतात समानंतर सिनेमाला आकार देण्याचे श्रेय सत्यजीत रे यांना जाते पण सत्यजीत रे यांच्यानंतर ही परंपरा अबाधित राखणार्‍या श्याम बेनेगल यांचा आंध्रप्रदेशातील त्रिमुलागिरी येथे १४ डिसेंबर १९३४ ला जन्म झाला होता. श्याम बेनेगल यांचे पूर्ण नाव श्यामसुंदर श्रीधर बेनेगल होते.त्यांचे वडील श्रीधर बेनेगल स्वतः एक छायाचित्रकार होते. लहानपणापासूनच श्याम बेनेगल यांना चित्रपट पाहाण्याची खूप आवड होती. त्यांच्या या छंदाला कुटुंबियांनीही प्रोत्साहन दिले. त्याकाळी प्रभात, मेहबूब आणि न्यू थिएटर्स सारख्या स्टुडिओंनी निर्माण केलेले चित्रपट त्यांच्या कुटुंबातील सारे सदस्य आवडीने पहात असत. त्यामुळे बालवयातच त्यांनी चित्रपट क्षेत्राचा ध्यास घेतला.

तसे पहायला गेले तर त्यांचा चित्रपटाशी लहानपणापासूनच संबंध होता. त्यांची आजी सुप्रसिध्द दिग्दर्शक गुरुदत्त यांच्या आजीची सख्खी बहीण होती. उस्मानिया विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात मास्टर ऑफ आर्ट्सची पदवी मिळवल्यानंतर श्याम बेनेगल यांनी आपली कारकिर्द सुरु केली जाहिराती बनविण्यापासून. जाहिरातींच्या संहिता लिहण्याचे काम त्यांनी स्वीकारले. मुंबईमध्ये लिंटास या मोठ्या जाहिरात कंपनीमध्ये कॉपिरायटर म्हणून काम करू लागले. त्यावेळी अनेक जाहिराती आणि लघुपट बनवताना चित्रपटाच्या तांत्रिक अंगांचा त्यांना भरपूर अनुभव मिळाला. १९६२ मध्ये त्यांनी गुजरात सरकारसाठी महिसागर धरणाची माहिती देणारा घेर बेठा गंगा हा गुजराती भाषेतील पहिला लघुपट बनवला. त्यानंतर त्यांनी पुण्यातील ‘फिल्म्स अँड टेलीव्हीजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ येथे काही काळ शिकवले. त्यांनी या मान्यवर संस्थेचे अध्यक्षपदही भूषविले आहे.

१९७० ते १९७२ दरम्यान श्याम बेनेगल यांना ‘होमी भाभा अधिछात्रवृत्ती’ मिळाली आणि त्या अंतर्गत त्यांनी न्यूयॉर्क आणि बोस्टन येथील लहान मुलांशी संबंधित दूरदर्शन क्षेत्रातही काम केले.पहिला चित्रपट करण्याआधी त्यांनी जवळपास ९०० जाहिरातींचे लिखाण व दिग्दर्शन केले होते. श्याम बेनेगल यांनी सिनेमा करण्याचा निर्णय घेतला तेव्हा चित्रपटसृष्टी आपली नवी ओळख निर्माण करण्याच्या प्रयत्नात होती. समानांतर सिनेमाला निर्मात्यांची कमी भासत होती. निर्मात्यांच्या आग्रहाखातर चित्रपटात अनेक गोष्टींशी तडजोड करावी लागत होती. न्यू सिनेमाची सुरुवात होतच होती. याचवेळेस श्याम बेनेगल यांनी चित्रपटाशी नाते जोडत चित्रपटसृष्टीला एक नवा आयाम दिला तो ही कोणतीही तडजोड न करता. भारतात परतल्यानंतर त्यांनी १९७४ मध्ये अंकुर हा त्यांचा पहिला चित्रपट दिग्दर्शित केला. बेनेगल यांच्यावर तरुणवयात आंध्रप्रदेशात त्याकाळी सुरू असलेल्या तेलंगणा राज्यनिर्मिती चळवळीचा मोठा प्रभाव पडला होता. यातूनच एक सर्वसमावेशक सामाजिक विचारांची बैठक त्यांच्या मनात तयार झाली. अंकुर चित्रपटात त्यांनी सरळ साध्या कथेतून ग्रामीण भारतातील जातीयता, वर्गवर्चस्व आणि स्त्री-पुरुष भेदाभेद यांमुळे निर्माण झालेली मानवी मनाची गुंतागुंत सादर करीत प्रेक्षकांना विचार करण्यास प्रवृत्त केले आहे. अंकुरचे बरेच कौतुक झाले आणि चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानितही करण्यात आले. अंकुरनंतर आलेल्या निशांत (१९७५) आणि मंथन (१९७६) या चित्रपटांतूनही त्यांनी ग्रामीण सामाजिक जीवनाचा पट उलगडत वास्तववादी चित्रपट निर्माण करण्याचा आपला हेतू ठोसपणे मांडला. चित्रपटासाठी त्यांनी एक नवे फायनान्शियल मॉडेल तयार केले.

मंथन हा चित्रपट या फंडिंग मॉडेलचे जिवंत उदाहरण होते. चित्रपट निर्माण करण्यासाठी नेहमीच मोठ्या प्रमाणावर निधी उभा करावा लागतो. बेनेगल यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी चित्रपट निर्मितीसाठी लागणारा निधी गोळा करताना नेहमी चाकोरीबाहेरचा विचार केला. दूधाचा व्यापार करणार्‍या छोट्या छोट्या गावांवर आधारित सिनेमाची कथा. या चित्रपटासाठी पाच लाख गाववाल्यांनी दोन रुपये वर्गणी गोळा करून निर्मिती खर्च उभारला आणि चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आपला चित्रपट पाहण्यासाठी तिकिटेही विकत घेतली. श्याम बेनेगल यांनी समाजातील वंचित व दुर्लक्षित घटकांना केंद्रित करून आपल्या चित्रपटांची निर्मिती केली. अंकुर आणि निशांत या चित्रपटातून त्यांनी समाजातील महिलांची दयनीय स्थिती समोर आणली. भूमिका या हंसा वाडकरांच्या आत्मचरित्रावरील चित्रपटातून त्यांनी महिलांच्या जीवनातील अपूर्णततेचा शोध दाखविला. अंतरनाद चित्रपटातून मच्छीमारांच्या समस्या, समरमधून दलितांमध्ये समान अधिकारासाठी झालेल्या जागृती तर हरीभरी तून महिलांच्या अधिकारांवर भाष्य केले. नसीरुद्दीन शाह, शबाना आझमी, अमरीश पुरी आणि स्मिता पाटील या दिग्गज कलाकारांनी त्यांच्या चित्रपटातून भूमिका केल्यात.

1974 मध्ये अंकुर या चित्रपटाच्या माध्यमातून कलात्मक चित्रपटांचा एक नवा अध्याय लिहिला गेला. धर्मवीर भारती यांच्या सूरज का सातवां घोडा या कादंबरीवर आधारीत चित्रपटातून त्यांनी पितृसत्ताक समाजाचा बुरखा फाडला तर सरदारी बेगममधून समाजाच्या बंधनांविरोधात बंड करणार्‍या महिलेची गोष्ट मांडली. मम्मो, सरदारी बेगम आणि झुबैदा या चित्रपटातून त्यांनी मुस्लिम महिलांचे जीवनवास्तव समोर ठेवले. मंडी चित्रपटातून समाजातील वेश्यांची गरज मांडली. समाजाचा तथाकथित व्हाइट कॉलर बुरखा टराटरा फाडला.याचबरोबर बेनेगल यांनी आजपर्यंत विविध विषयांवरील चरणदास चोर (१९७५), भूमिका (१९७७), कोंदुरा/अनुग्रहम (१९७८), जुनून (१९७९), कलयुग (१९८१), आरोहण (१९८३), मंडी (१९८३), त्रिकाल (१९८५), सुसमन (१९८७), अंतर्नाद (१९९१), सूरज का सातवा घोडा (१९९२), मम्मो (१९९४), सरदारी बेगम (१९९६), द मेकिंग ऑफ महात्मा (१९९६), समर (१९९८), हरीभरी (२०००), जुबेदा (२००१), नेताजी सुभाषचंद्र बोस (२००५), वेलकम टू सज्जनपूर (२००८), वेल डन अब्बा (२००९) इत्यादी चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.भारताच्या राष्ट्रीय फिल्म विकास निगम (एनएफडीसी) और बांग्लादेशच्या फिल्म विकास निगम (बीएफडीसी) यांच्या संयुक्त विद्यमाने निर्मित मुजीब : द मेकिंग ऑफ अ नेशन या चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे (२०२३). हा चित्रपट बांग्लादेशाचे राष्ट्रपिता शेख मुजीबुर रहमान यांच्यावर आणि बांग्लादेशाची निर्मिती यांवर आधारित आहे.

श्याम बेनेगल यांनी चित्रपटाच्या माध्यमातूनच नाही टेलिव्हिजनच्या माध्यमातून व्यक्त होत आपली एक अमीट छाप सोडली आहे. रामायण – महाभारत या मालिका लोकांच्या मनावर राज्य करत असताना. सरकारला भारताचा इतिहास छोट्या पडद्यावरून मांडण्याचा विचार समोर आला. या कामासाठी निवड झाली ती श्याम बेनेगल यांची. त्यांनी पंडित नेहरु यांनी लिहिलेल्या डिस्कव्हरी ऑफ इंडिया या पुस्तकाचा आधार घेऊन भारत एक खोज या मालिकेची निर्मिती व दिग्दर्शन केले. टेलिव्हिजनच्या इतिहासातील एक नवा आयाम या मालिकेने प्रस्थापित केला.

सत्यजित राय आणि मृणाल सेन या महान दिग्दर्शकांनी निर्माण केलेल्या समांतर चित्रपट चळवळीतून प्रेरणा घेत श्याम बेनेगल यांनी कलात्मक आणि व्यावसायिक चित्रपट शैलीला एकत्र आणणारा एक वेगळा मध्यम मार्ग चोखाळला आणि थबकलेल्या समांतर चित्रपट चळवळीला नवी दिशा दाखवली. समाजव्यवस्थेच्या परिघावर फेकल्या गेलेल्या व्यक्ती आणि समुदायांच्या कथा त्यांनी वेळोवेळी प्रामुख्याने मांडल्या. अशाप्रकारच्या समाजघटकांबद्दल भारतीय प्रेक्षकांच्या मनात सहानुभूती जागवत मानवतावादी दृष्टिकोन घडवण्याचा प्रयत्न केला. वेगळ्या प्रकारचे चित्रपट निर्माण करण्याचा प्रयत्न करताना त्यांनी कथेच्या निवेदन शैलीतही वेगळे प्रयोग करून पहिले. उदा., सूरज का सातवा घोडा हा चित्रपट.

भारतीय रेल्वेवर आधारित यात्रा आणि सत्यम शंकरमंची यांच्या अमरावती कथालु या तेलुगू कथासंग्रहावर आधारित अमरावती की कथायें तसेच कथासागर आणि संविधान या मालिका त्यांनी दूरदर्शनसाठी दिग्दर्शित केल्या आहेत. तसेच जवाहरलाल नेहरू आणि सत्यजित राय यांच्या जीवनावरील उत्तम लघुपटांची निर्मिती केली आहे.आजवर श्याम बेनेगल यांना चित्रपट क्षेत्राशी संबंधित अनेक पुरस्कार मिळाले आहेत. २००५ साली चित्रपटसृष्टीतील अत्यंत मानाचा ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ त्यांना प्रदान करण्यात आला आहे. तसेच भारतीय चित्रपटसृष्टीत वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या श्याम बेनेगल यांना भारत सरकारने ‘पद्मश्री’ (१९७६) आणि ‘पद्मभूषण’ (१९९१) पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. ‘मुंबई अकॅडमी ऑफ मुविंग इमेजेस’ या चित्रपट महोत्सवाचे अध्यक्षपद तसेच ‘फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडिया’ या चित्रपट संस्कृतीच्या प्रसार करणाऱ्या शिखर संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा त्यांनी समर्थपणे सांभाळली होती. त्यांना २०१८ सालच्या ‘मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’मध्ये भारतातील डॉक्युमेंटरी चळवळीतील अमूल्य योगदानासाठी त्यांना व्ही. शांताराम लाईफटाईम अचिव्हमेंट पुरस्कारही देण्यात आला आहे.आजही ते वेगवेगळ्या स्तरांवर चित्रपटसृष्टीशी निगडित आहेत.

वैयक्तिक आयुष्यात श्याम बेनेगल यांच्या पत्नीचे नाव नीरा आणि मुलीचे नाव पिया आहे. नीरा बेनेगल या बेनेगल यांच्या काही चित्रपटांच्या निर्मात्या आहेत. तसेच त्यांनी बेनेगल यांच्या काही चित्रपटांची वेशभूषा देखील केली आहे. पिया बेनेगल या व्यावसायिक वेशभूषाकार आहेत.

वयाच्या ९१ व्या वर्षी मूत्रपिंडाच्या आजाराने त्यांनी दि. २३ डिसेंबर २०२४ ला इहलोकाचा निरोप घेतला. ते देह रुपाने जरी आपल्यातून निघून गेले असले, तरी त्यांनी आपल्या कलाकृतीतून अनेक आठवणी मागे सोडल्या आहेत. आपल्या मुलाखतीतून मला भूतकाळात जगायचे नाही असे सांगणार्‍या श्याम बेनेगल यांच्या जीवनाचे हेच सूत्र होते असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. भावपूर्ण श्रध्दांजली

योगेश शुक्ल ९६५७७०१७९२

Spread the love