शालेय शिक्षण विभागाने शिष्यवृत्ती परीक्षा पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता त्यामध्ये पुन्हा बदल करुन ती पूर्ववत चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी करण्याबाबत पडताळणी करण्याच्या सूचना शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिले आहेत.
तसेच यावर्षी पासूनच हा निर्णय अंमलात आणण्याबाबत शालेय विभागाने प्रयत्न करावा असे निर्देश भुसे यांनी दिले.
शालेय शिक्षण विभागाने घेतलेले गणवेश खरेदी, पुस्तक-वही एकत्र असे निर्णय मंत्री भुसे यांनी यापूर्वीच बदलले आहेत. चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेली शिष्यवृत्ती परीक्षा पाचवीसाठी आणि सातवीसाठी असलेली शिष्यवृत्तीची परीक्षा आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी करण्यात आली होती.
हा निर्णय बदलण्याचे सूतोवाच दादा भुसे यांनी शालेय शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत दिले. दादा भुसे म्हणाले, ‘या बदलामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळू शकेल व त्यांचे पुढील शिक्षण सुलभ होईल. पुढील शिक्षण घेण्यास विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल. येत्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होईल, असा प्रयत्न शिक्षण विभागाने करावा.’
शिष्यवृत्तीच्या संख्येत वाढ हवी
मंत्रालयात विविध शिष्यवृत्तींबाबत व शिष्यवृत्ती योजनांच्या लाभार्थी संख्येत वाढ करण्याबाबत आढावा बैठक झाली. अनेक वर्षांपासून शिष्यवृत्तीच्या संच संख्येत कोणतीही वाढ किंवा बदल करण्यात आलेला नाही. गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांपर्यंत शिष्यवृत्तीचा लाभ पोहचविण्यासाठी शिष्यवृत्तीच्या संख्येत वाढ करण्याचा प्रस्ताव सादर करावा, असे निर्देशही मंत्री भुसे यांनी दिले आहेत.