जळगाव : जळगाव जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीपुर्वीच भाजपला धक्का बसला आहे. कारण धरणगाव गटातून संजय मुरलीधर पवार (राष्ट्रवादी), पारोळा गटातून आमदार चिमणराव पाटील, एरंडोल गटातून अमोल चिमणराव पाटील (शिवसेना) हे महाआघाडीचे तिघेजण बिनविरोध निवडले गेले आहेत. त्यामुळे बॅंक ताब्यात घेण्याचे भाजपचे स्वप्न आणखी कठीण झाले आहे.
जळगाव जिल्हा बँक संचालक पदाच्या निवडणुकीत अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस होता.अर्ज भरण्यासाठी प्रचंड गर्दी जिल्हा बँकेत झाली होती. सर्व पक्षीय पॅनल फिस्कटल्यानंतर भाजपने स्वतंत्र लढण्यासाठी कंबर कसली. त्यामुळे उमेदवारी दाखल करण्यासाठी सर्वच पक्षाची धांदल उडाली. तीन वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाल्याचे सांगण्यात येत आहे. धरणगाव, एरंडोल आणि पारोळा विविध कार्यकारी सोसयटी गटातून एकच अर्ज दाखल झाल्याचे सांगण्यात येत आहे. धरणगाव गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय पवार, पारोळा गटातून शिवसेना आमदार चिमणराव पाटील व एरंडोल गटातून शिवसेनेचे अमोल चिमणराव पाटील यांचेच केवळ अर्ज दाखल झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे तिघांचीही बिनविरोध निवड झाली आहे.
यामुळे महविकास आघाडीचे यश मानले जात आहे. आज सायंकाळी सात वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्यात आलेल्या उमेदवारांची यादी अधिकृत जाहीर होईल. त्या वेळी अधिक चित्र स्पष्ट होईल. शिवसेनेच्या आमदार चिमणराव पाटील हे ९ वेळा संचालकपदी निवडून आहे आहेत. तर त्यांची बिनविरोध ची ही तिसरी टर्म असेल. राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय पवार हे सुध्दा तिसऱ्यांदा बिनविरोध होत आहेत. तर शिवसेनेचे अमोल चिमणराव पाटील दुसऱ्यांदा बिनविरोध निवडून येत आहेत.