पत्नीच्या चारित्र्यावर संशय; पतीकडून निर्घृण हत्या

0
55

चाळीसगाव – चारित्र्यावर संशय घेत पती सतत पत्नीसोबत वाद घालत होता. याच कारणावरून झालेल्या वादातून रात्रीच्या सुमारास पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना तळोंदे दिगर (ता.चाळीसगाव) येथे घडली आहे. या घटनेनंतर मारेकरी पतीला मेहुणबारे पोलिसांनी अटक केली आहे.

तालुक्यातील तळोंदे दिगर येथे रामेश्वर रूपचंद राठोड (रा. हिंगणे देहरे, ता. नांदगाव) यांनी राजेश जगन पावरा (बारेला) व त्याची पत्नी शिवानी (वय २५, दोन्ही रा. रोहिणी भोईटी, ता. शिरपूर, जि. धुळे) यांना पंधरा दिवसांपूर्वीच शेतात कामावर ठेवले होते. मात्र तळोंदे येथे शेती कामासाठी आल्यापासून पती- पत्नीत नेहमी भांडणे व्हायची. राजेश हा त्याच्या पत्नीवर चारित्र्याचा संशय घेत तिला मारहाण करायचा. दरम्यान सोमवारी (२५ सप्टेंबर) सायंकाळी साडेसातच्या सुमारास शेतमालक रामेश्वर राठोड हे घरी असताना राजेश पावराची दोन्ही मुले शंकर व राकेश हे त्यांच्या घरी आले. त्यांनी वडील आईला मारहाण करीत असल्याचे सांगून तुम्ही लवकर शेतात चला, असे सांगितले. यावेळी त्यांनी पती- पत्नीची समजूत काधून घरी निघून गेले.

पत्नीला मारून बसला होता

दुसऱ्या दिवशी (२६ सप्टेंबर) सकाळी सव्वासहाच्या सुमारास राठोड हे इतर मजुरांसह शेतात गेले असता राजेश खाटेवर बसलेला होता. जनावरांचेही आवरसावर केलेली न दिसल्याने त्यांनी त्याला विचारले असता त्याने पत्नी शिवानीचे चारित्र्याबरोबर नसल्याने मी तिला मारुन टाकल्याचे सांगितले. हे ऐकताच राठोड यांनी घरात जाऊन पाहिले असता शिवानी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. राठोड यांनी ही माहिती पोलिस पाटलांना दिली. यानंतर मेहुणबारे पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक विष्णू आव्हाड सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजेश पावरा याच्या विरोधात मेहुणबारे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Spread the love