चक्क, पोलीस स्टेशनच्या आवारातूनच पळविले वाळूने भरलेले डंपर!

0
9

जळगाव – येथील पोलीस स्टेशनच्या आवारात महसूल खात्याने केलेल्या कारवाईत जप्त केलेले वाळूने भरलेले डंपर पळवून लावल्याची घटना घडली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, मुक्ताईनगर पोलीस स्टेशनच्या आवारात महसूल खात्याने जप्त केलेले डंपर लावण्यात आले होते. हे ट्रॅक्टर दिनांक १३ ऑक्टोबर २०२३ रोजी अंतुर्ली येथील मंडळ अधिकारी धनराज मुंढे यांनी यांनी कारवाई करून जप्त करत पोलीस स्टेशनला जमा केले होते. तेव्हापासून हे वाळूने पूर्ण भरलेले व विना क्रमांकाचे पिवळे डंपर हे मुक्ताईनगर पोलीस स्थानकाच्या आवारात लावलेले होते.

दरम्यान, अंमलदार प्रदीप मोहन इंगळे हे १६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसहा ते सव्वासातच्या सुमारास एका महिलेची फिर्याद नोंदवून घेत असतांना त्यांना पोलीस स्थानकाच्या आवारात लावलेले डंपर हे काही जणांनी सुरू करून पळवून नेल्याची माहिती मिळाली. त्यांनी बाहेर पाहिले असता डंपर पळवून नेल्याचे दिसून आले. या प्रकरणी तपास केला असता डंपर पळवून नेणारे निष्पन्न झाले. यात राज मनोज कवळे (रा. जळगाव); डंपरचा चालक पवन राजेंद्र ठाकरे (रा. जळगाव) यांच्यासह दोन अज्ञात इसमांनी हे कृत्य केल्याचे दिसून आले आहे. या प्रकरणी अंमलदार प्रदीप मोहन इंगळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वर नमूद चारही जणांच्या विरोधात मुक्ताईनगर पोलीस स्थानकात भादंवि कलम ३७९ व ३४ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलीस स्थानकाचे आवार हे अतिशय सुरक्षित मानले जाते. येथे वाळूने भरलेले डंपर अगदी सर्वांच्या समोर पळवून नेल्याने परिसरात एकच खळबळ उडाले असून या प्रकरणी चर्चेला उधाण आले आहे.

Spread the love