च्युइंगम खा, कोरोना पळवा!

0
48

मुंबई -कोरोनावर प्रभावी लस कोणती, याचे उत्तर संशोधकांनाही अद्याप देता आलेले नाही. दोन वर्षांपूर्वी कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर जवळपास वर्षभराच्या संशोधनानंतर कोरोनावर अनेक कंपन्यांनी लसनिर्मिती केली. मात्र, आपलीच लस सर्वात प्रभावी, असे कोणतीही कंपनी ठामपणे सांगू शकत नाही. त्यातच कोरोनाच्या नानाविध रूपे समोर आली आणि कोरोनाची दाहकता अधिकच वाढली. त्यामुळे या कंपन्यांनी केलेले दावे फोल ठरले. आता ओमायक्रॉन या काहीशा घातक कोरोनाच्या रूपामुळे संपूर्ण जग पुन्हा एकदा चिंतेत सापडले आहे. त्यामुळे संपूर्ण लसीकरण झालेल्यांना बूस्टर डोस देण्याबाबतची मागणी वाढू लागली आहे. आता अमेरिकेतील संशोधकांनी कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी च्युइंगमची निर्मिती केली आहे. हे च्युइंगम चघळल्यानंतर सार्स-कोव्ह-2 या कोरोना विषाणूचा तोंडाद्वारे होणारा प्रसार रोखता येऊ शकतो. एका विशिष्ट झाडाद्वारे हे प्रोटिनयुक्त च्युइंगम तयार करण्यात आले असून कोरोनासाठी हे च्युइंगम एखाद्या सापळ्याप्रमाणे काम करेल. या च्युइंगमद्वारे लाळेतील कोरोना विषाणूचा प्रभाव कमी होईल, जेणेकरून कोरोनाचा प्रसार रोखण्यास मदत होणार आहे, असा दावा संशोधकांनी केला आहे. पेनिनसिल्वेनिया विद्यापीठाच्या हेन्री डॅनियल यांनी विकसित केलेल्या या संशोधनानुसार, एखाद्या व्यक्तीला शिंकण्याद्वारे, खोकल्याद्वारे अथवा बोलण्याद्वारे सार्स-कोव्ह-2 या विषाणूचा संसर्ग झाला असेल, तर काहींना अनेक पद्धतीद्वारे कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. हे च्युइंगम लाळेतील कोरोनाच्या विषाणूवर थेट हल्ला चढवते, त्यामुळे संसर्ग झालेल्या व्यक्तीद्वारे इतरांना कोरोना विषाणूचा प्रसार होत नाही. कोरोनाचा उद्रेक होण्याआधी डॅनियल हे उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांसाठी एंजियोटेन्सिन-परिवर्तित एंजाइम-2 (एसीई-2) या प्रोटिनवर संशोधन करत होते. त्यांच्या प्रयोगशाळेत एसीई-2 हे प्रोटिन विकसित करण्यात आले होते. आता हेच प्रोटिन कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी प्रभावी मानले जात आहे. याच प्रोटिनचा आधार घेऊन संशोधक आता च्युइंगमच्या निर्मितीत गुंतले आहेत. डॅनियल आणि त्यांचे सहकारी ह्यून मायकेल आता हे प्रोटिन एका झाडात समाविष्ट करून च्युइंगम तयार करत आहेत. दालचिनीच्या चवीचे च्युइंगम सुरुवातीला तयार केले जातील. आता हे च्युइंगम तयार झाल्यानंतर डॅनियलची टीम वैद्यकीय परीक्षणाच्या परवानगीसाठी प्रतीक्षेत आहे.

Spread the love