मुंबई: उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्याच्या नेतृत्वाची धुरा कोण सांभाळणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती. मुख्यमंत्रीपदी भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्रीपदी शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे असतील असे अंदाज बांधले जात होते. मात्र हे सगळे तर्क-वितर्क फोल ठरवत देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांनाच आश्चर्यचकित केलं आहे. त्यांनी राज्याचे नवे मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे असतील असं जाहीर केलं आहे. आज संध्याकळी एकनाथ शिंदे राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील.
एकनाथ शिंदे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार हे घोषित होताच अनेकांनी सोशल मीडियाद्वारे व्यक्त होण्यास सुरुवात केली आहे. फक्त सामान्य व्यक्तींनीच नव्हे तर कलाक्षेत्रामधील मंडळी देखील याबाबत व्यक्त होताना दिसत आहेत. आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असणारे शरद पोंक्षे यांनी देखील एक पोस्ट केली आहे. त्याचीच चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे.
शरद पोंक्षे यांची पोस्ट चर्चेत
एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री होणार हे घोषित होताच शरद पोंक्षे यांनी म्हटलं की, “मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेबांचं अभिनंदन” शरद पोंक्षे यांनी एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन केलं आहे. त्यांनी ही पोस्ट शेअर करताच अनेकांनी कमेंटद्वारे याबाबत व्यक्त होण्यास सुरुवात केली आहे.
एका युजरने म्हटलं की, “अत्यंत विचारपूर्वक घेतलेला निर्णय. मा.एकनाथजी शिंदे यांचे त्रिवार अभिनंदन.” तर दुसऱ्या एका युजरने म्हटलं, “शपथ विधी तर होऊ दे.” महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये घडलेली ही मोठी घडामोड खरंच आश्चर्यचकित करणारी आहे. याआधी देखील शरद पोंक्षे यांनी एकनाथ शिंदे यांच्याबाबत एक पोस्ट शेअर केली होती. “हॉस्पिटलमध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा फोन आला. म्हणाले तुम्ही बिल भरायचे नाही. फक्त स्वत: ची काळजी घ्यायची आणि बरं व्हायचं…सख्ख्या भावासारखे ते माझ्या मागे उभे राहिले,” असं शरद पोंक्षे यांनी म्हटलं होतं.