समृद्धी महामार्गावर 10 एप्रिलपासून 15 हजार वाहनांच्या टायरची तपासणी करण्यात आली. यामध्ये तब्बल 750 वाहनांना खराब टायरमुळे समृद्धी महामार्गावर प्रवेश नाकारण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भिमनवर यांनी दिली. दरम्यान, परिवहन विभागाने रस्ता सुरक्षेच्या राबविलेल्या उपक्रमांमुळे राज्यातील महामार्गावरील अपघाती मृत्यूचे प्रमाण गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत यंदा कमी झाले आहे, असे त्यांनी सांगितले.
राज्य परिवहन विभाग व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांनी सिएट लिमिटेड या टायर उत्पादक कंपनीच्या तांत्रिक सहकार्याने रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने वाहनांच्या टायर तपासणीचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर शासनाच्या परिवहन विभागाच्या वतीने शिर्डी इंटरजेंचवरील टोलनाक्यावर टायर तपासणी केंद्र उभारण्यात आले आहे. भिमनवर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी रस्ता सुरक्षा कक्षाचे उपपरिवहन आयुक्त भरत कळसकर, श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ऊर्मिला पवार, संभाजीनगर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे, सहायक परिवहन अधिकारी मनीष दौंड, सिएट लिमिटेडचे सुनील झा, श्रीनिवास पत्की, अलियान वाझ, सुमेद्य वैद्य, नगर उपप्रादेशिक परिवन अधिकारी ऊर्मिला पवार आदी यावेळी उपस्थित होते.
भिमनवर म्हणाले, वेग मर्यादेचे उल्लंघन, फार काळ विश्रांती न घेता गाडी चालवली तर रस्ता संमोहन होऊन व वाहन सुस्थितीत नसणे या तीन कारणांमुळे समृद्धी महामार्गावर अपघात होत आहेत. वेग मर्यादेचे उल्लंघन करून वाहन चालविणाऱया वाहनधारकांचे समुपदेशन करण्यासाठी परिवहन विभागाने समृद्धी महामार्गावर वेगवेगळ्या ठिकाणी समुपदेशन केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. आतापर्यंत तीन हजारांहून अधिक वाहनधारकांचे समुपदेशन करण्यात आले आहे.
या टायर तपासणी केंद्रावर सकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत वाहनधारकांना नायट्रोजन भरणे, बेसिक एअर फिलिंग, टायर वेअर तपासणी, व्हॉल्व तपासणी, व्हॉल्व पिन चेक व रिप्लेसमेंट, बेसिक पंक्चर दुरुस्ती, टायर वेअर चेक यंत्राचे वितरण या सुविधा मोफत दिल्या जाणार आहेत. या सुविधेचा जास्तीत जास्त वाहनधारकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन नगर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ऊर्मिला पवार यांनी केले आहे.











