डोनाल्ड ट्रम्प यांच्या रॅलीत गोळीबार, थोडक्यात बचावले माजी राष्ट्राध्यक्ष; पाहा थरारक व्हिडिओ

0
19

अमेरिकेत सध्या निवडणुकीचे वातावरण असून अध्यक्षपदाच्या शर्यतीत आघाडीवर असलेले अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रॅलीत गोळीबार झाल्याची बातमी समोर आली आहे. यूएस सीक्रेट सर्व्हिसचे प्रवक्ते अँथनी गुग्लिएल्मी यांनी सांगितले की, ट्रम्प सुरक्षित आहेत.

या घटनेनंतर, डोनाल्ड ट्रम्प यांना यूएस सीक्रेट सर्व्हिस एजंट्सनी तत्काळ मंचावरून बाहेर नेले.

सीक्रेट सर्व्हिसने एका निवेदनात म्हटले आहे की ट्रम्प सुरक्षित आहेत आणि त्यांच्या संरक्षणासाठी उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत. ट्रम्प मंचावरून खाली आल्यानंतर लगेचच पोलिसांनी रॅलीचे मैदान रिकामे केले.

ही रॅली पेनसिल्व्हेनियाच्या ग्रेटर पिट्सबर्ग भागातील बटलर काउंटीमध्ये आयोजित करण्यात आली होती. बटलर काउंटी डिस्ट्रिक्ट ॲटर्नी रिचर्ड गोल्डिंगर यांनी सांगितले की, संशयित बंदूकधारी व्यक्तीला गोळी मारत खाली पाडले तर रॅलीत सहभागी झालेल्या एकाचा मृत्यूही झाला.

ट्रम्प यांच्या कानाजवळ रक्त कसे आले आणि ते कसे जखमी झाले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. व्हिडिओमध्ये ट्रम्प यांच्या उजव्या कानाला आणि चेहऱ्याच्या उजव्या बाजूला रक्त दिसत आहे. ट्रम्प ज्या स्टेजवर उभे होते त्या स्टेजजवळील छतावर सशस्त्र अधिकारीही तैनात करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान या हल्ल्यानंतर, सीक्रेट सर्व्हिस एजंट्सनी डोनाल्ड ट्रम्प यांना घेरल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यांच्या चेहऱ्यावर रक्त आल्याचे दिसत आहे.

रिपोर्ट्सनुसार, सीक्रेट सर्व्हिस एजंट्सनी शूटर मार्क व्हायलेट्सला मारले आहे. ही घटना घडण्यापूर्वी त्याने यूट्यूबवर एक व्हिडीओ अपलोड केला होता ज्यामध्ये जस्टिस कमिंग असे म्हटले होते. राष्ट्राध्यक्ष जो बिडेन, उपाध्यक्ष कमला हॅरिस आणि माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, तीन अमेरिकन सुरक्षा एजन्सी ट्रम्प यांच्यावरील हल्ल्याची चौकशी करत आहेत. एफबीआय, सीक्रेट सर्व्हिस आणि एटीएफने या प्रकरणाचा ताबा घेतला आहे. अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांच्या हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.

Spread the love