भरधाव बसची बाईकला जोरदार धडक, दाम्पत्याला ५० फूट फरफटत नेलं; बायकोचा मृत्यू

0
32

जळगाव -: जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील गडखांब येथे एका भरधाव बसने मोटरसायकलला जोरदार धडक दिल्याने लता मुरलीधर पाटील या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर त्यांचे पती मुरलीधर पाटील गंभीर जखमी झाले आहेत.

ही दुर्दैवी घटना मुरलीधर पाटील व त्यांच्या पत्नी लता पाटील हे दहिवद शिवारातील शेतात जाण्यासाठी मोटरसायकलवरून जाताना घडली.

चोपडा येथून अमळनेरकडे येणाऱ्या यावल आगाराच्या एमएच २० बीएल २६५६ क्रमांकाच्या एसटी बसने त्यांना समोरून जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीसह दोघांनाही बसने जवळपास ५० ते ६० फूट फरफटत नेलं. या धडकेत लता पाटील गंभीर जखमी झाल्या. तातडीने त्यांना उपचारासाठी धुळे येथील रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे पती मुरलीधर पाटील हे देखील गंभीर जखमी असून त्यांच्यावर अमळनेर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताविषयी दहिवद गावाचे स्थानिक तरुण नितीन सोनवणे यांनी माहिती दिली. ते सकाळी त्या दिशेला फिरायला गेले असता, त्यांच्या डोळ्यासमोर हा अपघात झाला.

Spread the love