गाडगे बाबा यांची शतकोत्तर सुवर्णजयंती

0
2

गाडगे बाबा यांचा जन्म २३ फेब्रुवारी १८७६ रोजी शेंडगाव तालुका दर्यापूर जिल्हा अमरावती येथे झला . हे वर्ष त्यांच्या जन्माचे शतकोत्तर सुवर्णजयंती वर्ष आहे . अगदी निरक्षर असलेले गाडगे बाबा आपल्या कीर्तनातून अगदी उच्याविद्याविभुशित लोकांनाही लाजवतील असे विचार मांडत असत . समाजात असलेल्या अनिष्ट चालीरीती , रूढी परंपरा , अंधश्रद्धा , उपास , तापास , नवस , पशुबळी , अस्पृश्यता , देव , धर्मभोळेपणा यावर ते प्रखर हमले करत . समाजप्रबोधनासाठी त्यांनी कीर्तन हे माध्यम निवडले होते . अत्यंत सोप्या भाषेत प्रश्नोत्तरे स्वरूपात ते प्रबोधन करीत असत . ते त्यांच्या आयुष्यात कधीच देवळात गेले नाही.

अगदी निरक्षर असणाऱ्या गाडगे बाबांना उच्यपदस्थ अधिकारी कीर्तनाला बोलावत होते . गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश मध्ये सुद्धा लोक त्यांना निमंत्रित करत होते . त्यांची राहणी अगदी साधी होती . अंगावर फाटकी गोधडी व हातात गाडगे आणि काठी राहत असे . यामुळे ते गाडगे बाबा , गोधडे महाराज म्हणून परिचित झाले . त्यांचे नाव डेबूजी होते मात्र या नावाने ते ओळखले जात नसत . त्यांचे वडील झिंगरा जाणोरकर तसे श्रीमंत होते मात्र त्यांचे अकाली निधन झाले व डेबूजी त्यांच्या आई सोबत मामांकडं राहायला आले .पुढं त्यांची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली राहिली नाही .

१९०५ पासून त्यांनी समाज प्रबोधनाचे कार्य सुरू केले . ते नेहमी १) चोरी करू नका , २) सावकाराकडून कर्ज काढू नका , ३) व्यसनाच्या आहारी जाऊ नका , ४) देवाधर्माच्या नावाखाली पशुहत्या करू नका , ५) जातीभेद , अस्पृश्यता पाळू नका असा उपदेश करत असत . गावांमध्ये अनेक दगडांना शेंदूर फासून लोक पूजा करत असत या गोष्टीला त्यांनी कडाडून विरोध केला , पण लोक ही बाब सोडायला तयार होत नसत तेंव्हा त्यांनी काही गावांतील शेंदूर फासलेले दगडं नदीत फेकून दिले .

गाडगे बाबा तसे अंधश्रद्धा निर्मूलन करणारेच होते . त्यांनी मुलांना शिक्षणाचा उपदेश दिला . त्यांनी काही शाळा , धर्मशाळा , वसतिगृह चालविले . त्यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोबत घनिष्ट संबंध होते. त्यांच्या कार्याची दखल घेऊन शासनाने अमरावती येथील विद्यापीठास गाडगे बाबांचे नाव दिले .

गाडगे बाबा तसे संत म्हणून सुद्धा परिचित आहेत . त्यांचे कार्य खूप मोठे आहे आज त्यांची १५० वी जयंती आहे . १५० व्या जयंती निम्मित खरेतर शासकीय , सामाजिक पातळीवर मोठयाप्रमाणात कार्यक्रमांचे आयोजन करणे गरजेचे होते. मात्र सर्वत्र उदासीनता दिसून येते . त्यांच्या नावाने असलेल्या विद्यापीठात सुद्धा विशेष कार्यक्रमांचे आयोजन दिसत नाही . खरेतर किमान विद्यापीठाने गाडगे बाबांच्या जीवन कार्यावरील एका संशोधनपर ग्रंथाचे प्रकाशन करणे गरजेचे होते . शासनाने त्यांच्या संबंधाने काही नवीन योजना जाहीर करणे आवश्यक होते .

त्यांनी प्रस्थापित व्यवस्थेला विचारलेले प्रश्न , समाजास सांगितलेला वैज्ञानिक दृष्टिकोन, स्वच्छतेचे महत्व , शिक्षणाचे महत्व देशाला नेहमीच नवी ऊर्जा देत राहील. गाडगे बाबा यांना विनम्र अभिवादन .

 

Spread the love