विकृतीचा कळस; महिलेवर आठ जणांकडून सामुहिक बलात्कार

0
41

बुलढाणा – :येथील राजूर घाटात धक्कादायक घटना घडली आहे. एका ३५ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. आठ जणांनी या महिलेवर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला. तसेच तिच्याकडील ४५ हजार रुपयेही लुटून आरोपी फरार झाले आहेत. या घटनेमुळे बुलढाण्यासह राज्यात खळबळ उडाली आहे.

बुलढाणा- मलकापूर मार्गावरील राजुर घाटातून पीडित महिला आणि तिचा नातेवाईक मित्र दोघेही खडकी गावी जात होते. त्यावेळी राजूर घाटातील देवीच्या मंदिराजवळ फोटो काढण्यासाठी म्हणून थांबले असताना आठ जणांचं टोळकं तिथे आलं. त्यानंतर त्यांनी या दोघांना प्रचंड मारहाण केली. महिलेला दरीत ओढत नेत तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी बोराखेडी पोलिसांत आठ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आठ जणांनी महिलेसोबत असलेल्या तरुणाला चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडील रोख रक्कम देखील लुटून घेतली.

बलात्कार केल्यानंतर हे आरोपी फरार होत असताना तक्रारकर्त्याने त्यांचा पाठलाग केला असता हे आरोपी मोहेगाव येथे गेले. मोहेगावच्या लोकांनी त्यातील एक आरोपी राहुल राठोड नावाचा असल्याची माहिती तक्रारकर्त्याला दिली आहे. यापूर्वी देखील याच राजुर घाटात बरेचदा बलात्काराच्या घटना घडल्या असल्याची माहिती आमदार संजय गायकवाड यांनी दिली आहे. मात्र, बदनामी पोटी तक्रारी दाखल केल्या जात नसल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास उशीर केल्याचा आरोपही आमदार संजय गायकवाड यांनी केला. गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात तीन तास ठिय्या आंदोलन केल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला. रात्री उशिरा गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.

Spread the love