गोळ्याबिस्कीट, भाजीपाला, फटाके विकून रिक्षा घेतली. ग.स.मध्ये शाखाधिकारी बनुन सेवानिवृत्तीही झाली..

0
11

चोपडा – येथील ग. स. संस्थेच्या शाखा चोपडा नं. ३ चे शाखाधिकारी शिवाजीराव यशवंतराव बाविस्कर हे मूळ रा. घोडगाव (ता.चोपडा) येथील पण वडील कामानिमित्त असलोद मंदाणे (ता. शहादा) येथे स्थायिक झाल्याने शिवाजीराव शाळा शिकत असतांनाच शाळेच्या गेटजवळ गोळ्या बिस्किट विकायचे. सुट्टीच्या दिवशी लोटगाडीवर भाजीपाला विकायचे. दिवाळीला फटाके, कंदील, पतंगच्या किरकोळ विक्रीतून पैसा जमवून बी.कॉम. झालेले शिवाजीराव घरपरिवाराचा गाडा चालवण्यासाठी रिक्षा चालवू लागले. अशा खडतर प्रवासातून त्यांचे हातेड खुर्द येथील शिवाजी सोनवणे यांच्या सुकन्या मिनाक्षी यांचेशी विवाह झाला. सासरे शिक्षकनेते असल्याने त्यांचे ग.स.च्या नेतेमंडळींशी जवळचे संबंध होते. त्यांच्या ओळखीने शिवाजीरावांना ग.स. संस्थेत लिपिकची नोकरी मिळाली. त्यांचेअंगी वक्तशीरपणा व शिस्तबद्धता असल्याने त्यांचे उपशाखाधिकारी तद्नंतर शाखाधिकारी पदावर प्रमोशन होत गेले. आधीच उशिरा मिळालेली नोकरी करीत असताना स्वतःच्या मुलांसह भावांची मुलेही उच्चशिक्षित केलीत. मुलगा मुली जावई नोकरीला आहेत. आई-वडिलांप्रमाणेच सासू-सासर्‍यांचीही काळजी घेऊन संस्थेची प्रामाणिकपणे २७ वर्षे सेवा करून नुकतीच त्यांची सेवानिवृत्तीही झाली.
त्यांच्या सेवापुर्ती सत्कार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहकारनेते आर.एच. बाविस्कर, प्रमुख पाहुणे म्हणून ग.स.चे माजी संचालक रमेश शिंदे, देवेंद्र पाटील, विद्यमान संचालक मंगेश भोईटे, योगेश सनेर, शिक्षकनेते एकनाथराव पाटील यांची उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांचे ग.स.स्टाफच्या वतीने यथोचित स्वागत करण्यात आले. तसेच प्रमुख सत्कारार्थी शिवाजीराव बाविस्कर यांचा सपत्नीक हार शाल बुके गिफ्ट प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक उपशाखाअधिकारी संजय पाटील यांनी केले. मान्यवरांनी आपल्या भाषणात श्री. बाविस्कर यांच्या सेवाकार्याचे कौतुक केले. याप्रसंगी शिवाजीराव बाविस्कर यांचे स्नेहीप्रेमी, सहकारीमित्र, नातेवाईक, भाऊबंदकीची मंडळी शेकडोंच्या संख्येने उपस्थित होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विभा.अधिकारी नारायण शिरसाठ, शाखाधिकारी माधवराव सोनवणे, स्मिता मोरे, दिलीप सपकाळे, जगन्नाथ बाविस्कर यांचेसह सर्व उपशाखाधिकारी व कर्मचारी बंधूभगिनी यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचलन वसंत पाटीलसर (बोरखेडा) यांनी तर आभार प्रदर्शन उज्वल शिंदे (वर्डी) यांनी केले. यावेळी उपस्थितांनी येथेच्छ् स्नेहभोजनाचाही आस्वाद घेतला.

Spread the love