चोपडा : तालुक्यातील गोरगावले बुद्रुक रस्त्यावरील हतनुरच्या लहान-मोठ्या कालव्यांवरील पुलांची रुंदी वाढविण्यात यावी,अशी मागणी गोरगावले चे माजी सरपंच जगन्नाथ बाविस्कर यांनी ह्या पत्रकान्वये केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, गोरगावले बुद्रुक रस्ता नवीन बनविण्यात आला असून या रस्त्याची रूंदी सुमारे दहा मीटर आहे. या रस्त्यावर भागवत शंकर पाटील यांच्या शेताजवळ मोठ्या पाटावरील पूल व नंदलाल वामनराव पाटील यांच्या शेताजवळील लहान पाटावरील पूल यांची रुंदी पाच मीटर आहे. त्यामुळे रस्ता मोठा व पुल लहान अशी परिस्थिती असल्याने दोन्ही पूल वळणावरच आहेत.मोठे वाहन जात असतांना लहान वाहनांना थांबुन रहावे लागते.दिवसा व रात्री अपरात्री लहानमोठी वाहने या पुलांवरून वळण घेताना थेट कालव्यात पडण्याच्या घटना घडत आहेत.याठिकाणी आतापर्यंत दहा पेक्षाही जास्त अपघात झालेले आहेत.त्यात सायकलस्वार, मोटरसायकल,गाडीबैल, फोरव्हिलर,मालट्रक,ट्रेक्टरआदींचे अपघात होऊन काहीजण थेट पाटात पडल्यामुळे त्यांना आपला जीवही गमवावा लागला आहे.येथे कायमच अपघातांची मालिका सुरूच आहे.
“हा विषय हतनूर कालवा विभागाचा असून त्यांनी पुलांचे रुंदीकरण करून देणे गरजेचे आहे.त्या ठिकाणी सा.बां.विभाग हस्तक्षेप करू शकत नाही”,अशी माहिती चोपडा सा.बां.चे अधिकारी प्रमोद सुशीर यांनी दिली आहे.भविष्यात ह्या अरुंद पुलांमुळे लहान-मोठे अपघात होतच राहतील.त्यासाठी संबंधित विभाग व ठेकेदार यांनी ह्या कालव्यांवरील पुलांची रुंदी वाढविण्यासाठी तात्काळ प्रयत्न करावेत,अशीही आग्रही मागणी गोरगावले बुद्रुक पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी केली आहे.