जळगाव – जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे जळगाव मुख्यालयी वन विभागाची एकूण पाच कार्यालये ही एकाच इमारतीत असावी.
या दृष्टीने ‘वन भवन’ इमारतीच्या बांधकामासाठी १३ कोटी ११ लाख ५७ हजार इतक्या रकमेच्या अंदाजपत्रकास शासनाच्या महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयानुसार ‘वन भवन’ला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निर्देशानुसार ‘वन भवनाचा’ परिपूर्ण प्रस्ताव उपवन संरक्षक प्रवीण ए. यांनी वन सचिव विवेक होशिंग यांच्याकडे सादर केला होता.
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मागणीनुसार जळगाव मुख्यालयी कार्यरत असलेल्या वन विभागाची एकूण पाच कार्यालये एकाच इमारतीत असावीत, या दृष्टीने ‘वन भवन’ जळगाव प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाच्या १३ कोटी ११ लाख रकमेच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता दिली आहे.
असे असेल ‘वन भवन’
जळगाव शहराच्या भाऊंच्या उद्यानाशेजारील यावल वन विभागाच्या बाजूला असलेल्या २५५१.८० चौरस मीटर क्षेत्रफळ जागेवर वन विभाग होणार आहे. या एकाच इमारतीत वन विभागाची पाच कार्यालये स्थापित होणार आहेत.
या वन भवनात जळगाव वन विभाग, यावल वन विभाग, सामाजिक वनीकरण जळगाव विभाग, वनपरिक्षेत्र अधिकारी सामाजिक वनीकरण विभाग, वनपरिक्षेत्र अधिकारी संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन विभाग (मोबाईल स्कॉड) असणार आहे.
ही सर्व कार्यालये एकाच छताखाली येणार आहेत. याशिवाय महिला कर्मचारी विश्राम कक्ष, वाहनचालक विश्राम कक्ष, उपाहारगृह, संगणक नियंत्रण कक्ष इत्यादी सुविधा या इमारतीत स्थापित करण्यात येणार आहेत.
“राज्याचा वन विभाग देशात सर्वोत्कृष्ट काम करणारा विभाग आहे. राज्यात वन क्षेत्राचा लक्षणीय विस्तार करण्याचे काम या विभागाने केले आहे. या नूतन इमारतीत वन विभागाची सर्व प्रमुख कार्यालये एकाच छताखाली येणार असल्याने प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीने सोय व्हावी, या दृष्टीने ‘वन भवन’च्या कामास मंजुरी घेतली असून, लवकरच या कामाला सुरवात होणार आहे.”-गुलाबराव पाटील, पालकमंत्री












