‘कार्यकर्त्याला हात लावला तर., गांXची अवलाद नाही’, गुलाबराव देवकर यांचा गुलाबराव पाटील यांच्यावर निशाणा

0
38

जळगाव -:  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जळगाव ग्रामीणचे उमेदवार गुलाबराव देवकर यांच्या प्रचाराच्या निमित्ताने पक्षप्रमुख शरद पवार यांची आज जळगावच्या धरणगावात सभा पार पडली. या सभेत गुलाबराव देवकर यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर सडकून टीका केली.

“यापुढे कार्यकर्त्याला हात लावला तर त्याचा हात काढल्याशिवाय राहणार नाही. गांडूची अवलाद नाही. या ठिकाणी काय मोगलाई सुरू आहे का?”, अशा शब्दांत गुलाबराव देवकर कडाडले. “ आमचे बॅनर फाडले तर आमचे कार्यकर्ते म्हटले त्यांचे पण बॅनर फाडतो. पण मी सांगितलं, आपली ती संस्कृती नाही”, असंही गुलाबराव देवकर म्हणाले.

“गुलाबराव पाटलांनी मला दहा वर्ष घरात बसवलं. माझं घरकुल काढलं. त्या घरकुल घोटाळ्यात माझा काही संबंध नव्हता. त्यामुळे 2014 ची निवडणूक मी जेलमधून लढलो. त्यावेळी तुम्ही कमी पडले. आपला पराभव झाला. उद्याची निवडणूक आपली आहे. 23 तारखेचा गुलाल आपला आहे. प्रति बारामती आपल्याला आपला मतदारसंघ करायची आहे”, असा निर्धार गुलाबराव देवकर यांनी बोलून दाखवला. “मागच्यावेळी 2009 मध्ये उमेदवारी मिळाली होती. त्यावेळी शरद पवार यांची एकच सभा झाली होती. तरी या ठिकाणी दोनदा आमदार असलेले शिवसेनेचे उपनेते गुलाबराव पाटील यांचा पराभव झाला होता. आता पुन्हा शरद पवार आले आहेत. आता काय होईल तुम्ही सांगा”, असं गुलाबराव देवकर म्हणाले.

गुलाबराव देवकर यांनी सांगितला मंत्रिपदाचा किस्सा

यावेळी गुलाबराव देवकर यांनी 2009 मध्ये मंत्रीपद कसं मिळालं? याबाबतचा किस्सा सांगितला. “मंत्रीपद देईन, साहेबांनी बोलावून सांगितलं होतं. मात्र घरातही आणि बाहेरही कुणाला सांगायचं नाही असं म्हटलं होतं. गुलाबराव पाटलांनी दहा वर्षात ठोस काम केलं असेल तर सांगा. मी 1 लाख रुपये बक्षीस देईन सांगितलं होतं. मात्र अजून उत्तर आलेलं नाही आणि उत्तर येणार सुद्धा नाही”, असं गुलाबराव देवकर यांनी सांगितलं.

देवकर आप्पांचा गुलाबराव पाटील यांच्यावर निशाणा

“मंत्री गुलाबराव पाटील यांनी मतदारसंघाचा विकास सोडून त्यांच्या कार्यकर्त्यांचा विकास केला. दोन नंबर धंदेवाल्यांचा विकास केला. यांचा विकास झालेला आहे. म्हणे, पानीवाला बाबा आहे. यांच्याकडे पाणीपुरवठा खातं आहे. या मतदारसंघातल्या मोठ्या गावांमध्ये 25-25 दिवस पाणी येत नाही. काही ठिकाणी जे पाणी येतं ते सुद्धा अशुद्ध आणि गढूळ पाणी येते. पाणी योजनांच्या दोन वर्षापासून वर्क ऑर्डर दिल्या. मात्र एकही योजनेच्या नळातून अद्यापपर्यंत पाणी आलेलं नाही. पाणी पुरवठा खातं असताना तुम्ही तुमच्या मतदारसंघातल्या लोकांना पाणी देऊ शकत नाही. माझ्याकडे पाणीपुरवठा खातं असतं तर मी धरणगावला दररोज पाणी दिलं असतं. मात्र काम करण्याची धमक आणि व्हिजन पाहिजे असते”, असा टोला गुलाबराव देवकर यांनी लगावला.

“यांचा दिवसभरातला टाईम कुठे जात असतो हे तुम्हाला माहिती आहे. तुम्हा सर्वांना सॅल्यूट आहे की, विरोधात असताना दहा वर्षापासून तुम्ही माझ्यासोबत आहात. समोर प्रचंड पैसा आहे. याला विकत घेऊ, त्याला पैसा देऊ, त्याला विकत घेऊ, याला विकत घेऊ, त्याला पाट्या देऊ, ह्यांना प्रचार करायला लोक सुद्धा भाड्याने आणावं लागतात. लोक आम्हाला सांगतात मतदानाला पैसे दिले तर अर्धे आम्ही ठेवू आणि अर्धे तुम्हाला देऊ. पालकमंत्री असताना शेतकऱ्यांकडे 100 टक्के दुर्लक्ष तर 75 टक्के शेतकऱ्यांना पिक विमाचे पैसे मिळालेच नाहीत. असं असेल तर तुम्हाला सत्तेवर असण्याचा अधिकार नाही”, अशी टीका गुलाबराव देवकर यांनी केली.

Spread the love