जळगाव :- जनतेवर अत्यंत जुलूम , जबरदस्ती करून त्यांचे जिणे मुश्किल करणाऱ्या शासना विरोधात सन १८१८ ला जगात प्रथमच मोठे युद्ध झाले यात अवघ्या पाचशे लोकांनी अठ्ठावीस हजार सैन्य कापून काठले व सत्ता उलथवून लावली . त्या क्रांतीचे स्मरण व्हावे म्हणून १ जानेवारी हा दिवस शौर्य दिन म्हणून साजरा केला जातो . हा दिवस माणसाला मानवता व स्वाभिमान काय असतो हे दाखवून देतो असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक जयसिंग वाघ यांनी केले.
१ जानेवारी रोजी सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ भारतीय बौद्ध महासभा , समता सैनिक दल , परिवर्तन ग्रुप तर्फे शौर्य दिनानिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात भाषण करतांना वाघ बोलत होते.
जयसिंग वाघ यांनी आपल्या भाषणात पुढं सांगितले की , जगात अश्या प्रकारचे शौर्य आज पर्यंत कोणीही केलेले नाही . अनेक राजे लोकांनी अनेक लढाया केल्या , जनतेने शासन विरोधात अनेकांनी सशस्त्र उठाव केला पण एवढ्या कमी प्रमाणात असलेल्या लोकांनी एवढ्या मोठ्या संख्येने सैन्याला साक्षात कापून काढल्याचा पराक्रम कोणीही केलेला नाही . या ऐतहासिक पराक्रमा पासून शासन करणाऱ्यांनी सुद्धा धडा घ्यावा असेही आवाहन वाघ यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश इंगळे , प्रास्ताविक सागर सदावर्ते , आभार युवराज पारधे यांनी केले. बी. एस. पवार यांनी मनोगत व्यक्त केले, सुरवातीस सामूहिकपणे त्रिसरण , पंचशिल घेण्यात आले . त्या नंतर समता सैनिक दलाचे डॉ. सचिन नरवाडे यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्यास मानवंदना दिली . परिवर्तन ग्रुप तर्फे पुतळ्याचे सुशोभीकरण करण्यात आले होते . शौर्य दिनाच्या जय जय काराने परिसर दणाणून गेला होता.
या प्रसंगी मोहन बिऱ्हाडे , कैलास उमाळे , स्वप्नील सोनवणे, चैत्राम भालेराव , सुनील शिरसाठ , ज्योती भालेराव , राधा जवरे , शोभा इंगळे , प्रमिला इंगळे , शोभा पातुडे , ज्योती निकम , यशोदा बागुल , विद्या झनके, ज्योती दाभाडे , भारती बिऱ्हाडे , ज्योती सोनवणे , उषा इंगळे आदींसह स्त्री, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.