मानवतावादी साहित्य बौद्ध धर्माची देन : जयसिंग वाघ

0
46

अमळनेर – गौतम बुद्ध यांनी जी विचारधारा मांडली तीचा प्रचार आणि प्रसार करण्या करीता साहित्य निर्मिती करण्यात आली, हे साहित्य बौद्ध साहित्य म्हणून ओळखले जाते. बौद्ध साहित्यात कर्मकांड, ढोंग, मंत्र, तंत्र नसल्याने तसेच हे साहित्य मानवी कल्याणाची भाषा करीत असल्याने ते मानवतावादी ठरते असे स्पष्ट प्रतिपादन प्रसिद्ध साहित्तीक जयसिंग वाघ यांनी केले.

प्रताप महाविद्यालय, अमळनेर तर्फे प्रसिद्ध साहित्तीक व विचारवंत प्रा. डॉ. म. सु. पगारे लिखित ‘बा, तथागता’ या पुस्तका वर आयोजित चर्चेत जयसिंग वाघ बोलत होते. ११ एप्रिल रोजी आयोजित या कार्यक्रमात प्रा. डॉ. रमेश माने संपादित ‘बा, तथागता मानवतावादी सौंदर्यशास्त्र’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

जयसिंग वाघ यांनी आपल्या भाषणात सांगितले की, बा, तथागता हा काव्यग्रंथ सर्वसामान्य व्यक्तिस समजेल अश्या सोप्या भाषेत लिहिला आहे, यात गौतम बुद्ध यांचेशी संवाद साधुन बुद्ध यांच्या एकूणच जीवन कार्य तसेच विचारधारा यावर प्रकाश टाकलेला आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी कुलगुरु डॉ. एन. के. ठाकरे होते. त्यांनी आपल्या भाषणात गौतम बुद्ध यांच्या विविध पैलुंवर प्रकाश टाकून बुद्धाच्या विचारांनीच मानवाचे कल्याण होणार आहे असे स्पष्ट केले. प्रा. डॉ. म. सु. पगारे यांनी बा, तथागता हा काव्यग्रंथ का लिहावासा वाटला व तो लिहिण्या करीता कोणकोणत्या ग्रंथांचा अभ्यास केला, काव्यग्रंथ प्रकाशित झाल्यानंतर त्यास मिळालेला प्रतिसाद विस्तृतपणे सांगितले. या काव्यग्रंथाच्या दोन आवृत्या संपल्या असून याच्या हिंदी, इंग्रजी, आहीराणी भाषेत भाषांतर केले जातआहे. या काव्यग्रंथावर विविध क्षेत्रातील लेखकांनी लेखन केले असून त्याचे स्वतंत्र पुस्तक आज प्रकाशित होत आहे हि बाब अभिमानास्पद आहे असे सांगितले .

या प्रसंगी प्राचार्य डॉ. संजीव गिरासे, प्रा. डॉ. धनराज धनगर यांनी सुद्धा आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. विलास मोरे यांनी तर आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर कांबळे यांनी केले.

सुरवातीस महात्मा फुले, बहिनाबाई चौधरी यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमास डॉ. पी. एस. भावसार, डॉ. धीरज वैष्णव, डॉ. संजीवकुमार सोनवणे, डॉ. रमेश पवार, प्रा. बी. एन. चौधरी आदिंसह प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी मोठ्यासंख्येने हजर होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता प्रा. योगेश पाटील, डॉ. विलास गावित, प्रा. प्रतिभा पाटील यांनी परिश्रम घेतले.

Spread the love