इम्रान खान यांना 10 वर्षांची शिक्षा! गोपनीय माहिती सार्वजनिक केल्याचा आरोप …. 

0
16

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना पाकिस्तानी न्यायालयाने 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. गोपनीयतेच्या कायद्याचा भंग केल्याप्रकरणी त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. इम्रान खान पंतप्रधान असताना गोपनीय माहिती सार्वजनिक केल्याचा इम्रान यांच्यावर आरोप होता. न्यायाधीश अबुआल जुल्कानैन यांनी मंगळवारी या संदर्भातील आदेश सुनावला. इम्रान यांच्यासोबत पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनाही 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

पाकिस्तानच्या वॉशिंग्टनमधील दूतावासातून पाकिस्तान सरकारला कळवण्यात आलेली गोपनीय माहिती इम्रान यांनी सार्वजनिक केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. शाह मेहमूद कुरेशी हे इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीक ए इन्साफ या पक्षाचे नेते आहेत. या पक्षाने या दोघांना सिक्षा सुनावल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मात्र सदर प्रकरण हे या दोघांविरोधात रचलेलं षडयंत्र असल्याचा आरोप पाकिस्तान तेहरीक ए इन्साफ पक्षाने केला आहे.

पाकिस्तानमध्ये 8 फेब्रुवारी रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर इमरान खान यांना हा मोठा झटका बसला आहे. इम्रान खान यांचा पक्ष पीटीआयवर सरकारने कडक कारवाई केली आहे. त्याचे निवडणूक चिन्ह बॅटवर देखील बंदी घालण्यात आली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे इम्रान खान यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

काय आहे सायफर प्रकरण –

सदर प्रकरण हे राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित प्रकरण आहे. इमरान खान यांच्यावर गोपनीय माहिती वैयक्तिक कारणांसाठी वापरल्याचा आरोप आहे. त्यामुळे इम्रान खान यांना पंतप्रधानपदावरून हटवण्यासाठी सर्व विरोधी पक्ष एकत्र आले. संसदेत बहुमत सिद्ध करू न शकल्याने इम्रान यांना खुर्चीवरून पायउतार व्हावे लागले होते.

सत्तेपासून बेदखल झाल्यानंतर इमरान खान यांनी थेट अमेरिकेवर आरोप केला होता. मला सत्तेतून बेदखल करण्यामागे अमेरिकेचा हात असल्याचा आरोप इमरान खान यांनी केला होता. इमरान यांनी आपल्या राजकीय फायद्यासाठी वादग्रस्त गोष्टी सार्वजनिक केल्या होत्या त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Spread the love