भुसावळ ‘तहसील’मध्ये उसळली गर्दी! शिधापत्रिकांची ऑनलाइन कामे बंदचा फटका; नागरिकांचे कार्यालयात हेलपाट

0
42

भुसावळ -: येथील तहसील कार्यालयातील पुरवठा विभागामध्ये शिधापत्रिकेवर नाव कमी करणे व नवीन नावे समाविष्ट करणे तसेच तीच नावे ऑनलाइन करण्याच्या प्रक्रियेसाठी दररोज प्रचंड गर्दी होताना दिसत आहे.

सुविधा केंद्रांमध्ये ऑनलाइन प्रक्रिया बंद आहे तर दुसरीकडे निवडणुकीच्या तोंडावर कार्यालयातील यंत्रणा आणखी व्यस्त होणार असल्याने कामे आणि कागदाचा गठ्ठा हातात घेऊन आपला नंबर केव्हा लागेल, या प्रतीक्षेत नागरिकांनी मंगळवारी (ता. १५) प्रचंड गर्दी केली.

शिधापत्रिकेत नाव कमी आणि नवीन नाव समाविष्ट करण्यासाठी भुसावळ तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाकडे शेकडो नागरिकांचा धावा सुरू आहे. त्यात शासनाने सुरू केलेल्या विविध योजनांचा लाभ मिळावा म्हणून ज्यांच्याकडे शिधापत्रिकेत नाव असूनही ऑनलाइन नाही, असे अर्जदार तहसीलच्या पुरवठा कार्यालयात येऊन वेळेत आपले काम करून घेण्यास पाहात आहेत.

मात्र कार्यलयात येऊन फक्त अर्ज देण्यासाठी पूर्ण दिवस जात आहे. या बाबीमुळे नागरिक संतप्त झाले आहेत. शिधापत्रिका ऑनलाइन करण्यासाठी नागरिकांना मोलमजुरी बुडवून हेलपाटे मारावे लागत आहेत. यासाठी अनेक दिवसांपासून ऑनलाइन कामे सुरू असताना ही कामे व्यवस्थितरित्या होत नसल्याने नागरिक या कार्यालयाच्या पायऱ्या झिजवत आहे.

 

Spread the love