वाळूमाफियाने चढवले प्रांताधिकार्‍याच्या वाहनावर ट्रक्टर, तलाठीला जिवेमारण्याची धमकी ! चोपडा येथील घटना

0
12

चोपडा – जिल्ह्यात वाळू माफियांचा उच्छाद थांबायला तयार नाही. जळगाव बैठक आटोपून चोपडा शहराकडे येत असलेल्या प्रांताधिकार्‍यांच्या वाहनाला अवैधरीत्या वाळू वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरने धडक दिली तसेच तलाठ्याला धमकी दिल्याचा प्रकार समोर आला. ही घटना मंगळवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास खडगाव गावाजवळ पडली. या अपघातात प्रांताधिकार्‍याच्या वाहनाचे नुकसान होऊन ते किरकोळ जखमी झाले. याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिसात ट्रॅक्टर चालक व मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

वाळू माफियांची मुजोरी कायम

चोपडा येथील प्रांताधिकारी एकनाथ बंगाळे हे जळगाव शहरातील बैठक आटोपून मंगळवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास भोकर खेडीभोकरी मार्गे चोपड्याकडे येत असताना त्यांना अवैधरीत्या वाळू भरलेले ट्रॅक्टर दिसले. यावेळी खडगाव जवळ तलाठी गुलाबसिंग पावरा यांना पुढे माहिती देऊन ट्रॅक्टर थांबवण्यासाठी त्यांनी सांगितले. ट्रॅक्टर चालकाने ट्रॅक्टर न थांबवता तलाठी पावरा यांना शिविगाळ करीत ट्रॅक्टर दामटले. प्रांताधिकारी एकनाथ बंगाळे यांनी ट्रॅक्टरच्या पुढे स्वतःच्या ताब्यातील कार (एम.एच.20 एफ.वाय.0216) उभी केल्यानंतर चालक राजेश विकास मालवे (रा.खरग, ता.चोपडा) याने पाठीमागून ट्रॅक्टर (एम.एच.19 बी.जी.8076) ठोकले. या अपघातात प्रांताधिकार्‍यांच्या वाहनांचे नुकसान झाले तर प्रांताधिकारी यांच्या उजव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली.

चालक व मालकाविरोधात गुन्हा

चोपडा ग्रामीण पोलिसात प्रांताधिकारी एकनाथ बंगाळे यांच्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालक राजेश विकास मालवे व मालक सुरेंद्र कोळी (रा. चोपडा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार किरण पाटील करीत आहेत.

Spread the love