हेमकांत गायकवाड
चोपडा येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयाच्या भूगोलशास्त्र विभागाच्यावतीने जागतिक पर्यटन दिन ऑनलाइन प्रणाली द्वारा उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. के. एन. सोनवणे, प्रमुख अतिथी उपप्राचार्य व भूगोलशास्त्र विभाग प्रमुख प्रा. एन. एस. कोल्हे, मार्गदर्शक डॉ. शैलेश वाघ उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पर्यटन दिनाचे महत्त्व विभागातील प्रा. सौ. संगीता पाटील यांनी विशद केले. पर्यटन ही मानवाची एक मुलभूत गरज असून प्रत्येकाला पर्यटनाची ओढ असते. जागतिक पर्यटन संघटनेच्या माध्यमातून १९८० पासून जागतिक पर्यटन दिन जागतिक स्तरावर साजरा करण्यात येतो. सन २०२१ साठी जागतिक पर्यटन संघटनेने पर्यटनातून कृषी विकास ही संकल्पना मांडलेली आहे. जागतिक स्तरावर पर्यटन उद्योगाला खूप मोठी संधी उपलब्ध असून पर्यटन उद्योग दिवसेंदिवस वाढीस लागत आहे. भारतासारख्या कृषिप्रधान राष्ट्रात कृषी पर्यटनाला चालना देण्याची गरज असून कृषी पर्यटनाच्या माध्यमातून कृषी व ग्रामीण व्यवस्थेचा पाया भक्कम होणार आहे. ग्रामीण भागात कृषी पर्यटनाद्वारे रोजगाराच्या संधी निर्माण होऊन पर्यटकांना मुक्त व शुद्ध वातावरणाचा लाभ प्राप्त होईल. थोडक्यात भारतात कृषी पर्यटनाला विकासाची खूप मोठी संधी उपलब्ध असल्याचे प्रतिपादन प्रा. डॉ. शैलेश वाघ यांनी केले.
विभाग प्रमुख प्रा. एन. एस. कोल्हे यांनी भूगोल व पर्यटनाचे संबंध व मानवी जीवनातील पर्यटनाचे महत्त्व याविषयी मत मांडले. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य डॉ. के. एन. सोनवणे यांनी मानवाच्या जीवनातील पर्यटनाचे महत्त्व सांगून पर्यटन सहलींच्या माध्यमातून विद्यार्थी विकास घडविण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक प्राध्यापक मुकेश पाटील यांनी केले तर आभार प्रा. मोतीराम यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. मुकेश पाटील, प्रा. सौ. संगीता पाटील, प्रा. मोतीराम पावरा, प्रा. गणेश पावरा यांनी परिश्रम घेतले.