भारतमातेचे शूर सुपुत्र, सैनिक देशाच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असतात. त्यांच्यामुळे आपण आपलं आयुष्य सुखाने जगू शकतो. ते देशाच्या संरक्षणासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आपले जीवन समर्पित करत असतात.’त्या’ शहीद जवांनाच्या स्मृती आता कायमच्या अजरामर होणार आहेत.
1965 पासून कारगिल, भारत-पाक युद्ध, चीनसोबतचे संघर्ष आणि विविध लष्करी मोहिमांमध्ये सहभागी होऊन मातृभूमीसाठी बलिदान दिलेल्या जिल्ह्यातील 28 शूर जवानांची नावे सैनिकी कल्याण विभागाने प्रशासनाला दिली आहेत. त्यांच्या शौर्याची साक्ष देणारे स्मारक त्यांच्या गावातच उभारण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.
या 28 वीरपुत्रांच्या गावांत त्यांच्या स्मरणार्थ ‘शौर्यस्मारक’ उभारण्यात येणार आहे. त्यातून त्यांचे शौर्य, त्याग आणि राष्ट्रप्रेम सदैव जिवंत राहणार आहे. त्यासाठी शासकीय जागेवर स्मारक उभारण्याचा प्रस्ताव अंदाजपत्रकासह सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. जळगावकरांनी प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.
या स्मारकांमुळे जिल्ह्यातील शहीद जवानांच्या शौर्याच्या आठवणी कायमच्या जपल्या जातील. त्यांचे योगदान उजळून निघेल आणि भविष्यातील पिढ्यांसाठी हे स्मारक आदर्श ठरतील. अशा भावना जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी व्यक्त केल्या आहेत.
प्रत्येक गावातील शासकीय जागेवरच हे स्मारक उभारण्यात येणार आहे. एकूण अंदाजे 25 लाख रुपयांचा खर्च एका स्मारकासाठी अपेक्षित आहे. जिल्हा वार्षिक योजना 2025-26 अंतर्गत नावीन्यपूर्ण योजनेतून या स्मारकांसाठी निधी उपलब्ध होणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल उपजिल्हाधिकारी, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि नगरपरिषदेच्या सहआयुक्तांना 9 मे रोजी पत्र पाठवून यासाठी तातडीने शासकीय जागांची माहिती, प्रस्ताव व अंदाजपत्रक सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
या गावांत होणार ‘शौर्यस्मारक’
पाचोरा तालुक्यातील- तांबोळे, खेडगाव, पिंपळगाव, नगरदेवळा, कुन्हाड, बाळद बु., भडगाव तालुक्यातील- पांढरद, जुवार्डी, अंजनविहिरे, टोणगाव., चाळीसगाव तालुक्यातील- शिरसगाव, चिंचखेडे, वडाळी., अमळनेर तालुक्यातील- अमळनेर, पातोंडा, मारवड., भुसावळ तालुक्यातील- फेकरी, भुसावळ, कुन्हे., पारोळा तालुक्यातील- तामसवाडी, इंधवे
एरंडोल तालुक्यातील एरंडोल., जामनेर तालुक्यातील- तोंडापूर., जळगाव शहर, चोपड्यातील नागलवाडी,. रावेर तालुक्यात- रोझोदा., धरणगाव तालुका- वंजारी खपाट या शौर्यभूमीच्या गावांत स्मारक उभारले जाणार आहे.