जळगावमधून संजय राऊत तोंड काळे करून जातील; गुलाबराव पाटील यांचा इशारा

0
21

जळगाव – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागल्यानंतर जिल्ह्यात महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचा राबता वाढला आहे. शिवसेनेचे (उध्दव ठाकरे) नेते खासदार संजय राऊत हे शुक्रवारपासून दोन दिवस जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.

या पार्श्वभूमीवर, शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावमध्ये आल्यावर राऊत तोंड काळे करून जातील, असा इशारा दिला आहे.

गेल्या वेळी जळगाव महापालिकेवर शिवसेनेची सत्ता होती. आगामी निवडणुकीतही बहुमत मिळवून महापालिकेवर झेंडा फडकावण्याची तयारी ठाकरे गटाने आतापासून सुरू केली आहे. त्यासाठी पक्षाचे नेते खासदार संजय राऊत, उपनेते संजय सावंत, आमदार मनोज जामसुतकर आदी शुक्रवारी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. खासदार राऊत मागच्या वेळीही (विधानसभा निवडणुकीत) जळगाव जिल्ह्यातील आमच्या पक्षाच्या पाच आमदारांना पाडण्यासाठी आले होते. मात्र, ते आमचा एकही आमदार पाडू शकले नाहीत, असे त्यांनी सांगितले.

चोपडा तालुक्यातील बोरमळी येथे वेळेवर आरोग्य सुविधा न मिळाल्याने एका आदिवासी महिलेची रस्त्यातच प्रसूती झाल्याचा प्रकार घडला आहे. त्याविषयी स्पष्टीकरण देताना, मंत्री पाटील यांनी आरोग्य विभागाची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला. पावसामुळे महिलेच्या मदतीसाठी १०८ रुग्णवाहिका वेळेवर पोहोचू शकली नसल्याचा दावा करून आपणच नंतर तिथे जिल्हाधिकाऱ्यांना पाठवल्याचे सांगितले. तरीही त्याठिकाणी रुग्णवाहिका वेळेवर का पोहोचली नाही, याची चौकशी केली जाईल. आणि कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले.

 

Spread the love