जय बलराम शेतकरी गट,तळवे यांच्याकडून सेंद्रिय शेतीविषयक प्रात्यक्षिक प्रशिक्षण कार्यक्रम

0
20

जय बलराम शेतकरी गट, तळवे यांच्या पुढाकाराने जीवामृत आणि गो-कृपा अमृत तयार करण्याचे सेंद्रिय शेतीविषयक प्रात्यक्षिक प्रशिक्षण उत्साहात पार पडले. रासायनिक इनपुटवरील अवलंबित्व कमी करून नैसर्गिक, कमी खर्चिक व टिकाऊ शेती करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.

या प्रशिक्षणासाठी कृषी विज्ञान केंद्र, कोळदे येथील मा. राजेंद्र दहातोंडे सर यांचे मार्गदर्शन घेण्यात आले. गटातील सदस्यांनी दहातोंडे सरांच्या सूचनांनुसार सेंद्रिय द्रावण प्रत्यक्ष तयार करून शेतकऱ्यांना त्याची पद्धत समजावली.यावेळी कार्यक्रमात तळोदा तालुका आत्मा प्रमुखचे श्री.विपुल चौधरी साहेब म्हणाले,“सेंद्रिय शेती ही भविष्यातील गरज असून जीवामृत आणि गो-कृपा अमृतासारखी द्रावणे मृदा आरोग्य सुधारण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. शेतकऱ्यांनी गटाच्या माध्यमातून अशा पद्धती स्वीकारल्यास कमी खर्चात उत्तम उत्पादन मिळवणे शक्य होईल.” त्यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक करत शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीकडे वळण्याचे आवाहन केले.

यावेळी कार्यक्रमात जय बलराम शेतकरी गट,तळवे सदस्य श्री.विजयराव सोनवणे म्हणाले, “गटाने तयार केलेले द्रावण कल्चर म्हणून सर्व शेतकऱ्यांना देण्यात येईल. प्रत्येक शेतकऱ्याने फक्त ५ लिटर द्रावणापासून २०० लिटरची टाकी तयार करून आपल्या शेतात वापर करावा. प्रत्यक्ष परिणाम दिसल्यावर गावात सेंद्रिय शेतीचा प्रसार अधिक वेगाने होईल.” त्यांनी शेतकऱ्यांना या उपक्रमात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमात गटाचे अध्यक्ष श्री. छोटू सुपडूसा कलाल, सचिव श्री. चंद्रकांत सोनवणे, गट सदस्य, श्री. गोटूसा कलाल तसेच शेतकरी श्री. शिरीष मगरे, श्री. देवेंद्र चित्ते, डॉ. शांतीलाल पिंपरे, श्री. संतोष चौधरी, श्री. नकुल ठाकरे आणि श्री.मैकू सक्सेना, श्री.आनंद शर्मा, श्री.अमित सक्सेना,श्री.तुषार सोनवणे उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ॲड.उमेश भैय्या विजयसा सोनवणे यांनी विशेष परिश्रम घेतले. गटाने सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी पुढील काळात आणखी उपक्रम राबविण्याची तयारी दर्शवली आहे.

Spread the love