कृषी क्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रयोग आणि सेंद्रिय शेतीचा प्रसार करणाऱ्या तळवे (ता. तळोदा) येथील ‘जय बलराम शेतकरी गट’ ला मानाचा समजला जाणारा ‘ॲग्रोवर्ल्ड आदर्श शेतकरी गट २०२६’ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. शहादा येथे सुरू असलेल्या भव्य ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनात हा सन्मान सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. विशेष म्हणजे, अशा प्रकारचा सन्मान मिळवणारा हा जिल्ह्यातील 2026 च्या शेतकरी गट ठरला आहे, ज्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातून गटावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
शहादा येथील नवीन बस स्टँड समोरील मैदानावर आयोजित ‘ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन २०२६’ मध्ये ३ जानेवारी रोजी हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. हा प्रतिष्ठेचा पुरस्कार नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) मा. श्री. नमन गोयल साहेब यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे आयोजक आणि ॲग्रोवर्ल्डचे संचालक श्री. शैलेंद्र चव्हाण तसेच कृषी क्षेत्रातील विविध नामांकित कंपन्यांचे डायरेक्टर आणि पदाधिकारी उपस्थित होते.
जय बलराम शेतकरी गटाने केवळ पारंपारिक शेतीवर अवलंबून न राहता सेंद्रिय पद्धतीचा अवलंब करत उत्तम शेतीचे मॉडेल उभे केले आहे. विषमुक्त अन्न आणि जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी गटाने केलेले प्रयत्न वाखाणण्याजोगी आहेत. केवळ स्वतः शेती न करता, इतर शेतकऱ्यांनाही याबाबतचे प्रशिक्षण देणे आणि शेतकऱ्यांचे उत्तम संघटन करणे, या श्रेणीत गटाने मोलाचे कार्य केले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत ‘ॲग्रोवर्ल्ड’च्या वतीने त्यांना पुरस्काराने गौरविण्यात आले.
हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी जय बलराम शेतकरी गटाचे संचालक मंडळ उपस्थित होते. यामध्ये गटाचे अध्यक्ष श्री.छोटू नाना कलाल, प्रगतशील शेतकरी श्री.विजयराव सोनवणे, गटाचे संचालक श्री.गोटू नाना कलाल, सचिव श्री.चंद्रकांत सोनवणे आणि गटाचे कार्यकारणी प्रमुख चि.उमेश भैय्या विजयसा सोनवणे यांनी मान्यवरांच्या हस्ते हा सन्मान स्वीकारला. सन्मानचिन्ह, मानपत्र आणि मेडल असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर गटाच्या वतीने प्रगतशील शेतकरी व गटाचे संचालक श्री.विजयराव सोनवणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, “हा पुरस्कार केवळ आमच्या एका गटाचा नसून सेंद्रिय शेतीसाठी झटणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याचा सन्मान आहे. या पुरस्कारामुळे आम्हाला कृषी क्षेत्रात आणखी जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे. भविष्यात आम्ही जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीकडे वळवण्यासाठी प्रयत्नशील राहू.”
जिल्ह्यात असा बहुमान मिळाल्याबद्दल ‘जय बलराम शेतकरी गट, तळवे’ यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.












