भुसावळ – साहित्तीक हे देशातील अतिशय जबाबदार नागरिक असतात, ते समाजास, चळवळीस एवढेच नाही तर देशास दिशा देण्याचे अत्यंत महत्वपूर्ण काम करतात असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्तीक व विचारवंत जयसिंग वाघ यांनी केले.
भुसावळ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय येथे आर. पी. आय. चे जिल्हा नेते तथा प्रसिद्ध विद्रोही कवि दिवंगत अनिल इंगळे यांच्या प्रथम स्मृतिदिना निमित्त आयोजित श्रद्धांजलि सभेत प्रमुख वक्ता म्हणून भाषण करतांना वाघ बोलत होते.
जयसिंग वाघ यांनी पुढं आपल्या भाषणात सांगितले की, अनिल इंगळे यांनी २५ वर्षे सलग साहित्य संमेलनांचे आयोजन केले. फुले आंबेडकर यांचे विचार महाराष्ट्रभर नेले, अनेक दिग्गज साहित्तीक, कलावंत, गायक, गीतकार त्यांनी या माध्यमातून भुसावळ येथे निमंत्रित केले. अनेकांना त्यांनी विविध पुरस्कार देऊन सन्मानित केले. अनेकांना मंच उपलब्ध करुन दिला तेव्हा एक साहित्तीक म्हणून त्यांनी आपली जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली आहे. अलिकड काही साहित्तीक आपली जबाबदारी विसरून सवंग व प्रसिद्धिलोलुप लिखाण करीत असल्याचे वाघ यांनी स्पष्ट करुन त्या बद्दल संताप व्यक्त केला. साहित्तीक हा अधिक कल्पनाविलासी नसावा तो कल्पनाविलासी असल्यास काल्पनीक कथा, भाकड कथा जन्माला येतात त्यातून समाजास योग्य दिशा मिळत नाही व प्रसंगी युवक हा सैरभैर होतो. काही प्रसंगी तो शस्त्र हाती घेतो . आज समाजात जे चिंतेचे वातावरण तयार झाले आहे त्यास असे कल्पनाविलासी साहित्तीक जबाबदार आहे असे वाघ यांनी स्पष्ट केले व युवकांनी वास्तववादी विचार करुन नवा सशक्त समाज निर्माण करावा असे आवाहन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कवी अशोक सर्वटकर होते. त्यांनी अनिल इंगळे यांच्या राजकीय कार्याची माहिती देऊन त्यांचा धाड़सीपणा स्पष्ट केला.
याप्रसंगी कामगार नेते अरुण दामोदर यांनी अनिल इंगळे यांच्या राजकीय, सामाजिक, साहित्तीक कार्याची माहिती देऊन त्यांनी अपंग, भिकारी, वेश्या यांच्या करीता केलेला संघर्ष मांडला. रीपाई चे जिल्हा उपाध्यक्ष विजय साळवे यांनी सांगितले की, इंगळे हे लढ़ाऊ तर होतेच तसेच ते अभ्यासू होते, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले त्यांचे आदर्श होते, त्यांनी अतिशय विद्रोही भूमिकेतुन आपले विचार मांडले आहेत .
नरेश गडवे, पप्पूभाई सुरडकर, सुनील ढ़ीवरे, डॉ. इम्रान, बालुभाऊ सोनवणे, सुनील आराक यांचीही या प्रसंगी भाषणे झाली.
मुख्य संयोजक तथा राष्ट्रीय दलित पँथर चे उपाध्यक्ष सिद्धार्थ सोनवणे यांनी अत्यंत विस्तृतरित्या भूमिका मांडून अनिल इंगळे यांच्या जीवन कार्याचा धावता आढावा मांडला व त्यांचे कार्य पुढं नेण्याचा संकल्प केला. तसेच महाराष्ट्र दलित साहित्य अकादमी तर्फे साहित्य चळवळ अधिक गतिमान करुन पुढील साहित्य संमेलनांचे आयोजन करणे कामी लवकरच निर्णय घेण्यात येईल असेही सिद्धार्थ सोनवणे यांनी स्पष्ट केले. सुरवातीस बुद्ध वंदना घेऊन अनिल इंगळे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, कार्यक्रमास लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.












