वीरेंद्र मंडोरा
बाळासाहेब पवार यांचा इतर परिचय
बाळासाहेब प्रदीपराव पवार यांचा जन्म पाचोरा येथील देशमुख वाडीत झाला आहे. त्यांचे शिक्षण जळगाव जिल्हातील भडगाव, अमळनेर तसेच जळगाव शहरात याशिवाय पाचगणी जि. सातारा, नागपूर या ठिकाणी झाले आहे. एम.जे. कॉलेजला शिकत असताना ते विद्यापीठ प्रतिनिधी म्हणून निवडून आले आहे. महाविद्यालयीन जीवनात त्यांनी क्रीडा क्षेत्रात मोठे नाव कमावले आहे. फुटबॉल, हॉकी, रिले या क्रीडा प्रकारात फायरिंग, स्विमिंग, बॉक्सिंग मध्ये ते तरबेज आहेत. त्यांनी सांस्कृतिक क्षेत्रात देखील लक्षवेधी कामगिरी केली असून पुणे विद्यापीठात विद्यार्थी परिषदचे चेअरमन असताना भुसावळला युथ फेस्टिवल आयोजित केला होता. तसेच मुंबई विद्यापिठ, जयपूर येथेही त्यांनी सांस्कृतिक महोत्सवात यश मिळवले आहे.
सहकार क्षेत्रात देखील त्यांचे प्राविण्य असून भडगाव तालुक्यात त्यांनी अनेक संस्था स्थापन केले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्राथमिक, माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालय त्यांनी सुरू केले आहेत.
राजकीय कारकीर्द
बाळासाहेब प्रदीप पवार यांच्या राजकीय जीवनाची सुरवात विद्यार्थी दशेपासून झाली. जळगाव येथील एम. जे. कॉलेज मध्ये शिक्षण घेत असताना विद्यापीठ प्रतिनिधीही म्हणून निवडून आले होते. त्याच वर्षी पुणे विद्यापीठातील स्टुडन्ट कॉन्सिल मध्ये निवडून आले. प्रदीप पवार हे इंदिरा कॉंग्रेसची विद्यार्थी संघटना एन.एस.यु.आय. चे महाराष्ट्र सरचिटणीस झाले. नागपूरचे डॉ. श्रीकांत जिचकार हे त्या वेळेस चे एन. एस. यु. आय. महाराष्ट्र इंदिरा कॉंग्रेसचे अध्यक्ष होते. काँग्रेस पक्षाने पुणे विद्यापीठातील स्टुडन्ट कौन्सिलच्या निवडणुकाची संपूर्ण जबाबदारी प्रदीप पवार यांच्यावर सोपवली होती. १९७८ ते १९८६ पर्यत निवडणूक प्रदीप पवार यांच्या नेतृत्वाखाली झाल्या. जळगाव जिल्ह्यातून पुणे विद्यापीठाचे चेअरमन होण्याचा मान फक्त पवारांना मिळाला आहे. त्यानंतर खा. विलास मुत्तेमवार, खा. गुरुदास कामत, माजी मंत्री दिग्विजय खानविलकर या प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष्यांसोबत पवारांनी प्रदेश उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस अशी अनेक पदे भूषवली आहेत. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीची जबाबदारी घेतल्यानंतर त्यांनी काँग्रेस सेवादल ही संघटना अधिक प्रभावी करण्यासाठी महाराष्ट्र युवक काँग्रेस मधील प्रभावी युवक नेत्यांना सेवादल संघटनेत सामील करून घेतले. खा. तारीक अन्वर यांच्यावर ऑल इंडिया सेवादल अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली होती. खा. तारीक अन्वर यांनी महाराष्ट्र सेवादलाचे जबाबदारी राज्यातील सहा प्रमुख युवक नेत्यांवर सोपवली होती. त्यात पवारांवर प्रदेश सेवादल उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली होती. त्यासाठी कर्नाटक प्रांतातील घटप्रभा येथे सेवादल नॅशनल ट्रेनिंग (एन.ती.सी) ची जबाबदारी पदीप पवार यांना देण्यात आली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी विधानसभेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांची निवड झाल्यानंतर त्यांनी पवारांना पदोन्नती देऊन प्रदेश काँग्रेस सरचिटणीस पदाची जबाबदारी दिली.
१९९२ साली भडगाव येथून जिल्हा परिषदेची निवडणूक निवडून भडगाव पंचायत समितीचे सभापती म्हणून काम केले. त्यांच्या कार्यकाळात भडगाव पंचायत समितीचे ग्राम अभियानात राज्यात प्रथम क्रमांक मिळविला होता. त्यामुळे २ ऑक्टोबर १९९४ रोजी वर्धा येथे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार व राज्यपाल पी.सी. अलेक्झांडर यांचे हस्ते सुवर्ण पदक व दोन लक्ष रुपये देण्यात आले होते. १९९५ साली त्यांनी विधानसभेचे भडगाव-पारोळा येथून काँग्रेस पक्षाची उमेदवारी देण्यात आली होती. १९९७ साली पुन्हा जिल्हा परिषदेत विजयी होऊन त्यांनी जिल्हा परिषदेचे बांधकाम आणि आरोग्य सभापती म्हणून काम पाहिले. याच दरम्यान पक्ष श्रेष्ठींनी महाराष्ट्र राज्यातील लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, नगरपरिषदेच्या निवडणुकीत प्रदेश काँग्रेसचे निरिक्षक म्हणून जबाबदारी दिली होती. लोकसभा ( अहमदनगर, कराड) झिलापरिषद (धुळे, लातूर, गोंदिया, नासिक) नगरपरिषद (मनमाड, नांदगाव, कालवण, सुरगाणा, डहाणू, बुलढाणा) तसेच मध्य प्रदेशातील धर्मपुरी व झाबुवा विधानसभा आणि उत्तरप्रदेशातील पिलिभीत असे अनेक ठिकाणी परराज्यात देखील पक्षाने महत्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत.












