जळगाव -:शहरातील आदर्श नगर परिसरात असलेल्या कॅफेत प्रेमीयुगुलांना अश्लिल चाळे करण्यासाठी बसू देत असल्याची तक्रार पोलीस अधीक्षकांकडे प्राप्त झाली होती. याबाबतची खात्री करण्यासाठी पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा यांनी त्या कॅफेवर धाड टाकली. याठिकाणी काही ग्राहक मिळून आले. दरम्यान पोलिसांनी कॅफे चालकाला ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध रामानंद नगर पोलीस ठाण्यात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
शहरातील आदर्शनगर परिसरात मार्बल कॅफे आहे. याठिकाणी प्रेमीयुगुलांना पैसे घेवून जागा उपलब्ध करुन देत असल्याची तक्रार पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली होती. या तक्रारीची खात्री करुन कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षकांनी दिल्या होत्या. त्यानुसार आज सायंकाळच्या सुमारास पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा हे स्वत: साध्यावेशात जावून त्यांनी कॅफेची पाहणी केली. यावेळी त्याठिकाणी काही तरुण- तरुणी बसलेले असल्याचे त्यांना दिसून आले. दरम्यान, चिंथा यांनी तात्काळ रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांनी याठिकाणी येवून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
कॅफे चालकाविरुद्ध कारवाई
रामानंद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय शिंदे हे कर्मचार्यांसह कॅफेत दाखल झाले. त्यांनी याठिकाणी बसलेल्या तरुण तरुणींना ताब्यात घेत त्यांची विचारपूस करुन त्यांना सोडून दिले तर कॅफे चालकाला ताब्यात घेवून पोलीस ठाण्यात घेवून गेले. याठिकाणी कॅफे चालकाची चौकशी करुन त्याच्याविरुद्ध प्रतिबंधात्क कारवाई करुन त्याला सोडून देण्यात आले.
चौकशी करुन केली सुटका
पोलीसांनी अचानक कॅफेवर टाकलेल्या धाडीमुळे याठिकाणी बसलेल्या तरुणांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतू याठिकाणी पोलिसांना कुठल्याच प्रकारचे अश्लिचाळे सुरु असल्याचे दिसून न आल्याने त्यांनी त्या तरुणांची चौकशी करीत त्यांना सोडून दिले.
कॅफेमालक राजकीय पदाधिकारी ?
उच्चभ्रु वस्तीत सुरू असलेल्या कॅफेचा मालक हा राजकीय पदाधिकारी असल्याची माहिती सुत्रांनी दिली. त्यामुळेच या कॅफेकडे अनेकांनी दुर्लक्ष केले होते. मात्र आज झालेल्या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली आहे.