जळगाव :- येथील अजिंठा शासकीय विश्रामगृहात एका छोट्या समाजाच्या मुलीवर दोन लोकप्रतिनिधींनी लैंगिक अत्याचार केल्याच्या कथित चर्चेने जळगाव शहरात पुन्हा १९९४ मधील वासनकांडाच्या घटनेला उजाळा मिळत आहे. या घटनेने तर्क-वितर्कांना गेल्या दोन दिवसांपासून उधान आलेले असतांना आता नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी तपासाचे सूतोवाच देत गरज पडल्यास जळगावात येऊन स्वतः घटनेची चौकशी करणार असल्याची माहिती मिळाली आहे.जिल्हाधिकारी निवासस्थानासमोर अजिंठा शासकीय विश्रामगृह असून ऐन दिवाळीत येथे एकाच राजकीय पक्षातील दोन आमदारांनी एका मायक्रो ओबीसी समाजाच्या मुलीवर अत्याचार केल्याने व त्यामुळे पीडित मुलीचे ब्लडिंग होऊन प्रकृती खालावल्याने ‘त्या’ पीडितेला शहरातल्या एका खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. घटनेनंतर तक्रार करण्याच्या तयारीत असलेल्या पीडितेच्या मामाला लोकप्रतिनिधी मामा व दादा जोडीने गोंडस आमिष देत शहरातून गायब केल्याची चर्चा आहे. उपचाराच्या नावाखाली पीडितेला जळगाव येथुन औरंगाबाद व आता पुण्यात हलवण्यात आल्याचे समजते.
दरम्यान,कोविड काळात घराऐवजी गेल्या वर्ष-दीड वर्षांपासून अजिंठा विश्रामगृहात मुक्काम केलेल्या शहर विधानसभेचे आमदार सुरेश दामू उर्फ राजूमामा भोळे यांच्यासह चाळीसगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार मंगेश चव्हाण यांची थेट नावे याप्रकरणात पुढे येत असल्याने ज्येष्ठ पत्रकार दिलीप तिवारी यांनी दोन्ही आमदारांना ‘सिधी बात’ म्हणून खुलासा करण्यासाठी विचारणा केली असता दोघेही आमदारांनी या घटनेत आम्ही नव्हेच अशी प्रतिक्रिया दिल्याचे श्री.तिवारी यांनी त्यांच्या फेसबुक पेजवरील ‘दिलीप तिवारींचा चष्मा’ यावर म्हटले आहे.
दरम्यान,याबाबत नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक यांना तपासाच्या सूचना दिल्या असून अजिंठा विश्रामगृहाच्या बुकिंग कर्मचारी व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे प्राथमिक चौकशी सुरू झाल्याचे समजते. पीडित मुलीचे आडनाव व नातेवाईक यांचा तपास सुरू असल्याचे सुद्धा बोलले जात आहे.
राज्य महिला आयोगाच्या नवनियुक्त अध्यक्षा व राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा वंदना चौधरी यांना याबाबत माहिती घेण्याचे व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार देण्याचे सांगितल्याचे सुद्धा समजते. दरम्यान, राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षा सौ.चौधरी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना इस्पितळात भेटून याप्रकरणाची चर्चा करणार असल्याने कथित वासनकांड उघड होऊन यात सहभागी आमदारांचे काळे चेहरे पुढे येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.