ज्वेलर्स दुकानाची भिंत फोडून चोरी; सहा किलो चांदीसह रोकड लंपास

0
39

भडगाव -: शहरातील सराफ दुकानात मागील दुकानाची भिंत फोडून चोरट्यांनी आत प्रवेश करून सहा किलो चांदी व रोख रक्कम लंपास केली. त्यामुळे सराफ व्यापारी वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ही घटना मंगळवार (दि.18) रोजी सकाळी उघडकीस आल्यांनतर सराफ व्यापाऱ्यांसह परिसरात खळबळ उडाली.

भडगाव शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या नामांकित घोडके ज्वेलर्स दुकानात थरारक चोरीची घटना घडली आहे. अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या मागील भिंत फोडून तब्बल सहा किलो चांदी आणि रोख रक्कम लंपास केली. दोन दिवसांपासून बंद असलेल्या दुकानावर चोरट्यांनी नजर ठेवत ही चोरी केल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

घोडके सराफ दुकानाचे मालक बाहेरगावी गेल्यानंतर दुकान दोन दिवसांपासून बंद होते. या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी सोमवारी (दि.17) रोजी मध्यरात्री दुकानाच्या मागील बाजूची (JSN) भिंत फोडून आत प्रवेश केला. त्यांनी दुकानातील 6 किलो चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून पलायन केले. मंगळवारी (दि.17) रोजी सकाळी दुकान उघडण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना भिंत फोडलेली दिसली आणि चोरीचा प्रकार समोर आला. त्यांनी तातडीने मालकाला आणि पोलिसांना माहिती दिली.

ही चोरी शहराच्या मुख्य रस्त्यावर घडली असून, पोलिसांच्या गस्तीला आव्हान देणारी ठरली आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, चोरट्यांना पोलिसांचा धाकच उरला नाही का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. गेल्या काही दिवसांपासून भडगाव परिसरात गिरणा नदी पात्रातील वाळू उपसा आणि चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांची निष्क्रियता चर्चेचा विषय ठरली. भडगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांनी पंचनामा केला. चोरट्यांनी भिंत फोडण्यासाठी वापरलेली हत्यारे आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले असून पुढील तपास सुरु आहे. पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून या चोरीमुळे कायदा-सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित होत आहे.

Spread the love