जिल्ह्यातील जिल्हा परिषदेसह पंचायत समित्यांवर प्रशासकांची नियुक्ती !

0
16

जळगाव संदेश न्यूज नेटवर्क

जळगाव– :ओबीसी आरक्षण पुढे गेल्याने जिल्ह्यातील १५ पंचायत समित्यांवर १३ मार्च तर जिल्हा परिषदेवर २० मार्च पासून प्रशासकांची नियुक्ती करण्यात येत असून याबाबत ग्रामविकास खात्याने शासननिर्णय जारी केला आहे.

ओबीसी आरक्षणामुळे निवडणुका रखडणार आहेत. काल या आरक्षण विधेयकाला मंजुरी मिळाली. यामुळे ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भातल्या कायद्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मंत्री वडेट्टीवार यांनी सांगितल्यानुसार निवडणुका पुढे जाणार आहेत. दरम्यान, एकीकडे ओबीसी आरक्षण विधेयकावर स्वाक्षरी झाल्यानंतर राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाने जीआर काढून राज्यातील मुदत संपण्याच्या मार्गावर असणार्‍या जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांवर प्रशासकांची नियुक्ती केली आहे. या जीआरनुसार जळगाव जिल्ह्यातील १५ पंचायत समित्यांवर १३ मार्च म्हणजे उद्यापासूनच प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर जिल्हा परिषदेवर २० मार्चपासून प्रशासकाची नियुक्ती करण्यात येत असल्याचे या शासन निर्णयात नमूद केले आहे. आपण वाचत आहात लाईव्ह ट्रेंडस न्यूजचा स्पेशल रिपोर्ट.

दरम्यान, जीआरनुसार जळगाव जिल्हा परिषदेचे प्रमुख प्रशासक म्हणून जि.प. सीईओ अर्थात डॉ. पंकज आशिया यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर जिल्ह्यातील सर्वच्या सर्व म्हणजे १५ पंचायत समित्यांवर तेथील गटविकास अधिकार्‍यांना प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. प्रशासकांच्या नियुक्त्या चार महिन्यांसाठी करण्यात आल्याचे या शासन निर्णयात म्हटले आहे.

दरम्यान, वडेट्टीवार यांनी म्हटल्यानुसार सहा महिन्यांच्या आत निवडणुकांची प्रक्रिया सुरू होणार असली तरी यातील क्लिष्टता आणि आरक्षणाबाबतचा ठोस निर्णय या कालावधीत होईलच याची शक्यता नाही. यामुळे निवडणुका दिवाळीनंतरच होण्याची शक्यता आहे. यामुळे जळगाव जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांवर प्रशासकराज येणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

Spread the love