जळगाव – शिवाजी नगर येथील नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांच्यावर आज जुना जकात नाका तोडण्यावरून झालेल्या वादात हल्ला झाल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. हा हल्ला अवैध व्यावसायिकांनी केल्याची तक्रार दारकुंडे यांनी केली आहे.शिवाजीनगर परिसरात जुना जकात नाका असून याचा सध्या काहीही उपयोग होत नाही. या नाक्यात अवैध दारू आणि सट्टयाचा व्यवसाय चालतो. तसेच येथील टारगट मंडळी ही महिलांची छेड काढत असल्याची तक्रार परिसरातील नागरिकांनी नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांच्याकडे केली होती. या अनुषंगाने त्यांनी महापालिकेकडे हा नाका पाडण्यासाठी पाठपुरावा केला होता. प्रशासनाने याला परवानगी दिल्यामुळे आज हा नाका पाडण्यासाठी नगरपालिकेचे पथक गेले होते.याठिकाणी महापालिकेचे पथक जेसीबी, ट्रॅक्टरसह गेले असतांना भोई नावाच्या अवैध दारू विक्रेत्याने नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांना मारहाण केली. यानंतर महेश पवार, त्याचा भाऊ, अजय तांबोळी आणि दोन अन्य अशा पाच जणांनी त्यांना दगडाने मारहाण केली. यामुळे नवनाथ दारकुंडे यांनी शहर पोलीस स्थानकात तक्रार केली आहे.