“जंगली रम्मी पे आओ ना महाराज”  कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचा ‘रम्मी’चा डाव; विरोधकांचा चौफेर हल्ला!

0
39

गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेले कृषीमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा एकदा टीकेचे धनी ठरले आहेत. यावेळी निमित्त ठरले आहे, विधानसभेच्या पवित्र सभागृहात मोबाईलवर रम्मी खेळतानाचा त्यांचा व्हायरल झालेला एक व्हिडिओ. या व्हिडिओने विरोधकांना आयतेच कोलीत दिले असून, त्यांनी कृषीमंत्र्यांवर आरोपांचा चौफेर हल्ला चढवला आहे.

रोहित पवारांकडून ‘जंगली रम्मी’चा टोला

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आपल्या ‘एक्स’ हँडलवरून कृषीमंत्र्यांचा हा व्हिडिओ शेअर करत थेट निशाणा साधला आहे. “एकिकडे राज्यातील शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना आणि रोज सरासरी ८ शेतकरी आत्महत्या करत असताना, सत्ताधारी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना काहीच काम उरलेले नाही, त्यामुळेच कृषीमंत्र्यांना सभागृहात बसून रम्मी खेळण्याची वेळ आली असावी,” असा खोचक टोला त्यांनी लगावला. इतकेच नाही, तर व्हिडिओसोबत “जंगली रम्मी पे आओ ना महाराज” असे कॅप्शन देत त्यांनी कृषीमंत्र्यांच्या परिस्थितीची खिल्ली उडवली.

आव्हाडांचा सवाल: ‘शेतकऱ्यांनो विसरा हमी, खेळा रम्मी’

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही या प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. आपल्या ‘एक्स’ हँडलवरून ट्विट करत त्यांनी थेट कृषीमंत्र्यांवर वार केला. “शेतकऱ्यांनो विसरा हमी, खेळा रम्मी,” असा खणखणीत टोला त्यांनी लगावला. लोकशाहीच्या मंदिरात सत्ताधारी आमदारांचे हे कृत्य धक्कादायक असल्याचे सांगत, ‘जंगली रम्मी’सारख्या खेळांमुळे अनेक आत्महत्या झाल्या असताना, मंत्रीच तो खेळ सभागृहात खेळत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.

वडेट्टीवारांचा ‘नतद्रष्ट सरकार’वर घाणाघात

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनीही या घटनेवरून सरकारला धारेवर धरले. कृषीमंत्र्यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांनी म्हटले, “हे नतद्रष्ट सरकार आहे, जे जनतेच्या बोकांडी बसले आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात असे सरकार पुन्हा होणार नाही. शेतकरी कर्जाखाली दबलेला असताना, रोज आत्महत्या करत असताना, हे सरकार पूर्णपणे बेपर्वा झाले आहे.”

 

Spread the love