दिपक नेवे
यावल नगर परिषदेच्या हद्दीतील गट नंबर 46 माधव नगर मधील मुख्य रस्ता हा लेआउट धारकाने लोखंडी अँगल लावून बंद केल्याने व रस्त्याला लागून असलेल्या गटारीची तोडफोड करून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याने लेआउट धारकावर गुन्हा दाखल करून रस्ता पूर्ववत सुरू करण्यात यावा म्हणून त्यावर नगरपरिषदेचे गटनेता नगरसेवक अतुल पाटील यांनी मुख्य अधिकारी यांना निवेदन दिले असून उपोषणाचा इशारा दिला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, यावल नगरपालिकेच्या हद्दीतील गट नंबर 46 वरील माधव नगर भागातील मुख्य रस्ता गेल्या 30 ते 35 वर्षापासून विरार नगर, गणेश नगर, एकरा नगर, रजा नगर भागातील नागरिक नगर रचना विभाग जळगाव यांचे मंजूर नकाशा प्रमाणे वही वाटीने वापरत आहे. मात्र गेल्या आठवड्यात अचानक पणे लेआउट धारकाने सदर रस्त्यावर लोखंडी अँगल गाडून रस्ता अडवणूक करून रस्ता बंद करून टाकलेला आहे. तसेच रस्त्याला लागून नगरपरिषदेने बांधलेली कटार तोडफोड करून मातीने भराव करून बंद करून टाकली आहे. रस्ता बंद केल्याने नागरिकांना फेऱ्याने ये-येणे जाणे करावी लागत असल्याने मनस्ताप सहन करावा लागत आहे. गेल्या अनेक वर्षापासून वापरात असलेल्या या रस्त्यावर यापूर्वी नगर परिषदेने पथदिवे यांसाठी इलेक्ट्रिकचे खांबउभारलेले असून रस्तादेखील डांबरीकरण केलेले आहे. मात्र लेआउट धारक याने सार्वजनिक रस्ता बंद करून टाकल्याने नागरिकांमध्ये नगरपरिषदे बद्दल रोष व्यक्त होत आहे. हा रस्ता पूर्ववत सुरू करून रस्ता अडवणाऱ्या व गटारीची तोडफोड करून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होऊन कारवाई करणे बाबत यावल येथील नगरसेवक अतुल पाटील यांनी मुख्याधिकारी अविनाश गांगुर्डे यांना निवेदन दिले आहे. लेआउट धारक यांनी केलेले अतिक्रमण आठ दिवसात न काढल्यास व रस्ता पूर्व सुरू न केल्यास नागरिकांसह उपोषण करणार असल्याचा इशारा पाटील यांनी दिला आहे. याबाबत नगरपरिषद काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे












