मुंबई – वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री केतकी चितळेहीच्या तुरुंगवासावर चक्क पुस्तक येत आहे. गेल्या वर्षी केतकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्यानंतर तुरुंगवास भोगावा लागला होता. याच ४१ दिवसांच्या तुरुंगवासावर केतकीनंच पुस्तक लिहिलं आहे. याबाबतची माहिती तिनं स्वतः इन्स्टाग्राम लाईव्हच्या माध्यमातून चाहत्यांना दिली आहे.
काल रात्री केतकीनं वेगवेगळ्या मुद्द्यांविषयी बोलण्यासाठी इन्स्टाग्राम लाईव्ह केलं होत. यामध्ये मतदान ओळखपत्रासाठी नोंदणी करा, मतदान करा. युसीसीबाबत तुमचं मत मांडा. एपिलेप्सी कम्युनिटीमध्ये असलेला आकाश दीक्षित हा कशाप्रकारे फसवणूक करत आहे, अशा अनेक मुद्द्यांवर केतकी इन्स्टाग्रामवर लाईव्हवर बोलत होती. याच वेळी तिनं एका चाहत्याला उत्तर देताना पुढच्या वर्षीय आपल्या आयुष्यावर आधारित पुस्तक प्रकाशित होणार असल्याचं सांगितलं.
एका चाहत्यानं तिला विचारलं होतं की, “तुमची स्टोरी?” यावर उत्तर देताना केतकी म्हणाली की, “पुढच्या वर्षी माझं पुस्तक प्रकाशित होतंय. तर जरुर विकत घ्या. तुम्हाला माझं संपूर्ण आयुष्य नाही, पण तुरुंगात जायचा प्रवास आणि का? याच्या मागील कारण कळेल. पुढच्या वर्षी ते पुस्तक प्रकाशित होतंय. माझ्याबाबतीत नेमकं काय घडलं होतं? यावर पुस्तकात लिहिण्यात आलेलं आहे. कृपया, जेव्हा पुस्तक प्रकाशित होईल तेव्हा जरूर विकत घ्या.”











