खोक्या भोसले अर्थात सतीश भोसले याला व्हिआयपी ट्रिटमेंट दिल्याबद्दल दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी हे आदेश दिले आहेत.
या कारवाईचे संकेत त्यांनी यापूर्वीच दिले होते. खोक्याचा फोनवर बोलतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, त्यानंतर हे प्रकरण चव्हाट्यावर आलं आहे.
नेमकं काय घडलं?
बॅटनं मारहाण केल्या प्रकरणी अटकेत असलेल्या सतीश भोसले ऊर्फ खोक्याला शिरूर कासार न्यायालयासमोर सोमवारी (ता.२४) हजर करण्यात आलं होतं. यावेळी कोर्टानं पुन्हा न्यायालयीन कोठडी दिल्यानंतर त्याला जिल्हा कारागृहात सादर करण्यासाठी आणलेल्या पोलिसांनी व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याचा प्रकार समोर आला. तसंच जिल्हा कारागृहात नेण्यापूर्वी त्याच्यासोबत असलेल्या पोलिसांनी पार्किंगमध्ये त्याच्या नातेवाइकांनी आणलेला जेवणाचा डब्बा त्याला दिला तसंच त्याचे हात धुण्याची सरबराई केली, याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या व्हिडिओनंतरच बीड पोलिसांवर मोठ्या प्रमाणावर टीका होऊ लागली, तसंच पोलिसांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलं होतं. त्यामुळं याची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी दोन पोलीस कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत.
शिरूर तालुक्यातील झापेवाडी येथील सतीश ऊर्फ खोक्या भोसले हा सोशल मीडियावर पैसे उधळत आल्याच्या व्हिडिओनं चर्चेत आला होता. यानंतर त्याने शिरूर तालुक्यात ढाकणे पिता-पुत्रांना तसंच बुलडाणा जिल्ह्यातील जेसीबी ऑपरेटरला जबर मारहाण केल्याचेही समोर आले होतं. या दोन प्रकरणांत नाव आल्यानंतर खोक्या वन्यजीवांची तस्करी करत असल्याचे आरोप झाल्यानं वन विभागानं त्याच्या झापेवाडी येथील अतिक्रमित घरावर छापा मारला.